वाढते ऊन आणि कोरोनाचा प्रादुर्भावाने पसरला बाजारपेठेत सन्नाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:28 IST2021-03-28T04:28:05+5:302021-03-28T04:28:05+5:30
हिंगोली जिल्ह्यात आता सक्रिय रुग्णांची संख्या साडेसहाशेच्या जवळपास पोहोचली आहे. आतापर्यंतचा हा उच्चांकी आकडा आहे. तर रोजच कोरोना रुग्णाच्या ...

वाढते ऊन आणि कोरोनाचा प्रादुर्भावाने पसरला बाजारपेठेत सन्नाटा
हिंगोली जिल्ह्यात आता सक्रिय रुग्णांची संख्या साडेसहाशेच्या जवळपास पोहोचली आहे. आतापर्यंतचा हा उच्चांकी आकडा आहे. तर रोजच कोरोना रुग्णाच्या मृत्यूचे आकडे वाढत आहेत. त्यामुळे बाजारपेठेत होणारी गर्दी मंदावली आहे. शिवाय आता उन्हाचा कडाका वाढला आहे. दुपारच्या वेळी बाहेर पडणे अवघड होत आहे. उन्हाचा पारा ३७ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. त्यामुळे कोरोना सोबतच उन्हापासून बचावासाठी नागरिक घराबाहेर पडत नसल्याचे दिसून येत आहे. एरवी सलग सुट्या आल्या म्हणजे बाजारपेठेत गर्दी होत असते. शिवाय प्रवास करणारे ही मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात. मात्र आजूबाजूच्या जिल्ह्यात टाळेबंदी लागली असल्याने कोणी बाहेर पडत नसल्याचे दिसून येत आहे. पुन्हा एकदा गेल्यावर्षी सारखी परिस्थिती निर्माण झाली असल्याने कोरोनाची भीती वाढत चालली आहे. यावर्षी लग्नसराईवर ही कोरोनाचा परिणाम दिसून येत आहे. त्यातच प्रशासनाने परवानगी घेतल्याशिवाय विवाह लावल्यास गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता हळूहळू वऱ्हाडी मंडळीच्या संख्येवर ही मर्यादा येत आहेत. शनिवारी हिंगोलीच्या बाजारपेठेतील गर्दी मंदावली होती. दुपारपर्यंत बाजारपेठ सुरू राहत असली तरीही सकाळपासूनच गर्दी नसल्याने आगामी होळी व धूलिवंदनाच्या सणासाठी दुकाने लावून बसलेल्या विक्रेत्यांना फटका सोसावा लागला. काही ठिकाणी दारूच्या दुकानावर मात्र गर्दी होत असल्याचे दिसत होते.