ग्रा.पं. सदस्यांसाठी सातवी उत्तीर्ण आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:24 IST2020-12-25T04:24:26+5:302020-12-25T04:24:26+5:30
कळमनुरी : ग्रा.पं. सदस्यांसाठी सातवी उत्तीर्ण होणे आवश्यक असून सातवी परीक्षा उत्तीर्ण असल्याशिवाय त्याला निवडणूक लढविता येणार नाही. असे ...

ग्रा.पं. सदस्यांसाठी सातवी उत्तीर्ण आवश्यक
कळमनुरी : ग्रा.पं. सदस्यांसाठी सातवी उत्तीर्ण होणे आवश्यक असून सातवी परीक्षा उत्तीर्ण असल्याशिवाय त्याला निवडणूक लढविता येणार नाही. असे राज्य निवडणूक आयोगाने २४ डिसेंबर रोजी काढलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे.
सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचे नामनिर्देशन पत्र भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरणे सुरु आहे. या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीकरिता ग्रामपंचायत पदाच्या उमेदवाराचे वय २१ वर्षे असावे. तसेच १ जानेवारी १९९५ रोजी अथवा त्यानंतर जन्मलेली असावी. तो निवडणूक नियमांच्या कायद्याखाली अपात्र ठरविलेला नसावा, तसेच ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवार सातवी परीक्षा उत्तीर्ण असावा. सरपंचाची निवड थेट निवडणुकी ऐवजी निवडून आलेल्या सदस्यांमधून करण्याकरिता सन २०२० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २ अन्वये शासन राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. यामध्ये नमूद कलम १३ च्या पोटकलम २ अ मधील ‘सरपंच’ या शब्दाऐवजी ‘सदस्य’ हा शब्द दाखल करण्यात येईल. राज्य निवडणूक आयोगाने ११ डिसेंबर २०२० रोजी घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार २३ ते ३० डिसेंबर या कालावधीत नामनिर्देशन पत्र दाखल करणाऱ्या उमेदवारांना याबाबतच्या स्पष्ट सूचना देण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. याबाबतचे परिपत्रक राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस यांनी २४ डिसेंबर रोजी काढले आहे.