महागाई किती रडविणार, चार महिन्यांत पेट्रोल ५, डिझेल ६, तर सिलिंडर १०० रुपयांनी महागला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:32 IST2021-02-09T04:32:45+5:302021-02-09T04:32:45+5:30
हिंगोली : पेट्रोल, डिझेलच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. मागील चार महिन्यांत पेंट्रोल ५ रुपये, डिझेल ६ ...

महागाई किती रडविणार, चार महिन्यांत पेट्रोल ५, डिझेल ६, तर सिलिंडर १०० रुपयांनी महागला
हिंगोली : पेट्रोल, डिझेलच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. मागील चार महिन्यांत पेंट्रोल ५ रुपये, डिझेल ६ रुपये प्रतिलिटर, तर सिलिंडरच्या दरात १०० रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्यांचे गणित कोलमडले आहे. दुचाकीवर व्यवसाय करणाऱ्या लहान व्यावसायिकांना तर आता कोणता व्यवसाय करावा, असा प्रश्न पडला आहे.
जिल्हाभरात पेट्रोल, डिझेलच्या दरात दररोजच काही ना काही पैशांनी वाढ होत आहे. मागील पंधरा दिवसांपासून दरवाढीचा आलेख चढताच राहत आहे. सोमवारी जिल्ह्यात पेट्रोल जवळपास ९४ रुपये ६्र० पैसे, तर डिझेल ८३ रुपये ८२ पैसे प्रतिलिटर होते. मात्र मागील चार महिन्यांचा आढावा घेतला असता पेट्रोल, डिझेलसह गॅस सिलिंडरच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. १ नोव्हेंबर २०२० रोजी पेट्रोलचा दर ८८.७६ प्रतिलिटर होता. डिझेल ७६.७३ प्रतिलिटर, तर गॅस सिलिंडर ६२० रुपये होता. तेच एका महिन्यात म्हणजे १ डिसेंबर २०२० रोजी पेट्रोल, डिझेलसह सिलिंडरच्या दरात वाढ झालेली पाहावयास मिळाली. १ डिसेंबर रोजी पेट्रोल ९०.०८ प्रतिलिटर, डिझेल ७८.८६ प्रतिलिटर होते, तर सिलिंडर मात्र ६७० रुपये झाला. तसेच १ जानेवारी २०२१ रोजी पेट्रोल ९१.३७ प्रतिलिटर, डिझेल ८०.३४ रुपये प्रतिलिटर झाले, तर सिलिंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ झाली. त्याचप्रमाणे १ फेब्रुवारी रोजी पेट्रोल ९३.८५, डिझेल ८३.०३ होते, तर सिलिंडरच्या दरात मात्र कोणतीही वाढ झाली नसल्याचे पाहावयास मिळाले.
पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दराने नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. लॉकडाऊननंतर आता कुठे सर्व व्यवहार सुरळीत झाले होते; मात्र आता पेट्रोल, डिझेलच्या वाढलेल्या दरामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत.
- नारायण शिंदे
काेरोनाच्या काळात सर्व व्यवहार ठप्प झाले होते. त्यामुळे अनेकांनी दुचाकी वाहनांवर व्यवसाय करण्यास सुरुवात केली. व्यवसायात जम बसत असतानाच पेट्रोल, डिझेलचे भाव वाढले आहेत. आता पेट्रोल टाकणे परवडेनासे झाले आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेलच्या किमती कमी कराव्यात.
- शेख शब्बीर
मागील चार महिन्यांत गॅस सिलिंडरच्या किमतीत जवळपास शंभर रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सिलिंडर कसा घ्यावा, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. सिलिंडरच्या किमती वाढल्याने महिला पुन्हा चुलीवर स्वयंपाक करीत आहेत. गॅस सिलिंडरच्या किमती कमी कराव्यात.
- छाया खिल्लारे
पेट्रोल (प्रतिलिटर)
१ नोव्हेबर ८८.७६
१ डिसेंबर ९०.०८
१ जानेवारी ९१.३७
१ फेब्रुवारी ९३.८५
डिझेल (प्रतिलिटर)
१ नोव्हेबर ७६.७३
१ डिसेंबर ७८.८६
१ जानेवारी ८०.३४
१ फेब्रुवारी ८३.०३
सिलिंडरचे भाव
१ नोव्हेबर ६२०
१ डिसेंबर ६७०
१ जानेवारी ७२०
१ फेब्रुवारी ७२०