चार टँकर सुरू; सात गावांचे प्रस्ताव पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:30 IST2021-05-12T04:30:41+5:302021-05-12T04:30:41+5:30

हिंगोली : जिल्ह्यात परंपरागत टंचाईग्रस्त असलेल्या गावांना यंदाही टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार असून, टँकरची निविदाच मंजूर न झाल्याने सात ...

Four tankers start; Proposals for seven villages fell | चार टँकर सुरू; सात गावांचे प्रस्ताव पडून

चार टँकर सुरू; सात गावांचे प्रस्ताव पडून

हिंगोली : जिल्ह्यात परंपरागत टंचाईग्रस्त असलेल्या गावांना यंदाही टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार असून, टँकरची निविदाच मंजूर न झाल्याने सात गावांचे टँकरचे प्रस्ताव पडून आहेत.

हिंगोली जिल्ह्यात सध्या चार टँकरद्वारे तीन गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये बळसोंडला दोन, खापरखेडा पानबुडेवस्तीला १ तर डिग्रसवाणी येथे एक टँकर सुरू आहे. मात्र, अजूनही सात गावांचे प्रस्ताव आलेले आहेत. त्यात अजूनही काहीच निर्णय झाला नाही. जिल्हा प्रशासनाने टँकरचा पुरवठा करण्यासाठी काढलेल्या निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने हा प्रकार घडला. प्रशासनाने निविदा काढल्यानंतर चार निविदा आल्या होत्या. त्यापैकी दोन अपात्र ठरल्या. किमान तीन तरी पात्र ठरणे आवश्यक होते. मात्र, तसे न झाल्याने ही प्रक्रिया तेथेच संपुष्टात आली. आता नव्याने पुन्हा निविदा मागविण्यात आल्या आहेत. आता या प्रक्रियेतून पुन्हा कंत्राटदार निवडावा लागणार आहे. शासकीय टँकर चारच असल्याने तीन गावांना पाणीपुरवठा सुरू झाला. मात्र, लोहरा, हातमाली, सावरखेडा, अंधारवाडी, माळधावंडा, पेडगाववाडी व जयपूर या टंचाईग्रस्त गावांबाबत टँकर नसल्याने काहीच निर्णय होऊ शकला नाही. आता ही निविदा मंजूर व्हायला जून उजाडला, तर तोपर्यंत या गावांना टंचाईच्या झळा सोसण्याची वेळ येणार असल्याचे दिसत आहे.

यंदा तशीही कमी गावांत टंचाई आहे. त्यामुळे केवळ ६२ गावांतच अधिग्रहण करावे लागले. मात्र, पारंपरिक टंचाईग्रस्त गावांत दरवर्षीच टँकर द्यावे लागते. या गावांची टँकरमुक्ती जलयुक्त शिवार योजनेनंतरही झाली नाही. यातील काही गावांची तर निवडच झाली होती की नाही, हा प्रश्न आहे.

Web Title: Four tankers start; Proposals for seven villages fell