नालीवर ढापा बसविण्याचा विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:16 IST2020-12-28T04:16:08+5:302020-12-28T04:16:08+5:30
केसापूर रस्त्याची दुरवस्था केसापूर : हिंगोली तालुक्यातील केसापूर या ठिकाणी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ...

नालीवर ढापा बसविण्याचा विसर
केसापूर रस्त्याची दुरवस्था
केसापूर : हिंगोली तालुक्यातील केसापूर या ठिकाणी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरासह दलित वस्तीमध्ये पाण्याच्या योग्य विल्हेवाटीची व्यवस्था नाही. यामुळे याठिकाणी नियमित घाणीचे साम्राज्य असते. याठिकाणच्या नाल्याही तुंबलेल्या अवस्थेत आहेत. याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष झाले आहे. तरी याकडे ग्रामपंचायतीने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांतून करण्यात येत आहे.
शेतकऱ्यास पीक कर्ज देण्यास टाळाटाळ
संतुक पिंपरी : गावातील शेतकरी अलंकार संभाजी काशिदे यांनी खरीप हंगामाच्या पीक कर्जाचा अर्ज ऑनलाइन भरला आहे. हिंगोलीतील आयडीबीआय बँकेकडे गाव दत्तक असल्याने त्यांना इतर बँकेतून पीक कर्ज मिळत नाही. यासाठी काशिदे यांनी वारंवार हिंगोलीतील आयडीबीआय बँकेत पीक कर्जाची मागणी केली असता, त्यांना बँकेतील शाखा व्यवस्थापकाकडून टाळले जात आहे. पीक कर्ज मिळावे, अशी मागणी शेतकरी काशिदे यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
रस्ता आला नाहीसा होण्याच्या मार्गावर
घोटादेवी : हिंगोली तालुक्यातील घोटादेवी - नर्सी नामदेव तसेच इडोळीकडे जाणारा मार्ग पूर्णपणे उखडला आहे. या रस्त्यावर मागील १५ वर्षांपूर्वी मुरूम टाकण्यात आला होता. आता हा मुरूम पूर्णपणे उखडला असून हा रस्ता नाहीसा होण्याच्या मार्गावर असून, रस्ताच बंद होतो की काय, अशी चिंता व्यक्त होत आहे. यासाठी संबंधित विभागाने लक्ष देऊन या मार्गावर मुरूम टाकावा व हा रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
एमआयडीसी भागातील रस्त्यावर खड्डेच खड्डे
संतुक पिंपरी : हिंगोली तालुक्यातील संतुक पिंपरी गावालगत असणाऱ्या एमआयडीसीच्या मुख्य चौकातील रस्त्यावर मोठाले खड्डे पडले आहेत. अनेक उद्योगधंदे याठिकाणी असल्याने मोठाल्या वाहनांची ये-जा याठिकाणी असते; पण रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे या भागातील नागरिकांसह वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे. मागील अनेक महिन्यांपासून हे खड्डे पडलेले आहेत. याकडे कोणाचेही लक्ष नसल्यामुळे आता हे खड्डे दिवसेंदिवस वाढत चालले आहेत.
बदलत्या वातावरणाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम
संतुक पिंपरी : हिंगोली तालुक्यातील संतुक पिंपरी गावातील नागरिकांच्या आरोग्यावर बदलत्या वातावरणाचा मोठा परिणाम पडत आहे. दोन दिवसांपासून कधी ऊन तर कधी ढगाळ वातावरण राहत असल्याने गावातील वयोवृद्धांना दम्याचा तर बालकांना खोकला, सर्दी, ताप, हिवतापेचा आजार होत आहे.
वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढला
साखरा : सेनगाव तालुक्यातील साखरा शेतशिवारातील गहू व हरभरा पीक चांगलेच बहरले आहे. पीक बहरलेले दिसत असल्याने शेतशिवारात वन्यप्राणीही जास्त प्रमाणावर घुसत आहेत. शेतातील पिकांमध्ये वानर, रोही, रानडुकरे घुसून पिकांची मोठी नासाडी करीत आहेत. यासाठी गावकऱ्यांना अहोरात्र शेतात पिकांची राखण करावी लागत आहे. या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.
शेतशिवारातील वीज पुरवठा वारंवार खंडित
रामेश्वर तांडा : कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा गावासह शेतातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. सध्या पिकांना पाणी द्यावे लागत आहे. शेतकऱ्यांना पाणी देताना मध्येच वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर विजेची प्रतीक्षा करीत शेतात कित्येक तास बसावे लागत आहे. तसेच शेतशिवारात अंधार असल्यामुळे अनेक वन्यप्राणी पिकांची नासाडी करीत आहे. यासाठी शेतशिवारात सुरळीत वीज पुरवठा व्हावा, अशी आशा या भागातील शेतकरी वर्ग व्यक्त करीत आहे.