तूर कापणी अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:56 IST2021-02-05T07:56:42+5:302021-02-05T07:56:42+5:30
फाळेगाव फाटा-गावापर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था फाळेगाव : हिंगोली तालुक्यातील फाळेगाव फाटा - गावापर्यंत ३ कि.मी. अंतर आहे. या रस्त्याचे २ ...

तूर कापणी अंतिम टप्प्यात
फाळेगाव फाटा-गावापर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था
फाळेगाव : हिंगोली तालुक्यातील फाळेगाव फाटा - गावापर्यंत ३ कि.मी. अंतर आहे. या रस्त्याचे २ कि. मी. पर्यंत दुरुस्तीचे काम करण्यात आलेले आहे. तसेच एक किमी रस्त्याचे काम अर्धवट झाले आहे. यामुळे या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. यामुळे वाहनधारकांना ये-जा करताना त्रास होत आहे. यासाठी उर्वरित रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी गावकऱ्यांतून होत आहे.
एमआयडीसी भागातील रस्ते उखडले
संतुक पिंपरी : हिंगोली तालुक्यातील संतुक पिंपरी गावालगत असणाऱ्या एमआयडीसी भागातील सर्व रस्ते उखडले आहे. या रस्त्यांवर ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. या भागात मोठे उद्योग कारखाने असल्याने या ठिकाणी जड वाहनांची सदैव वर्दळ असते. पण रस्ते उखडल्यामुळे या वाहनधारकांना मोठा त्रास होत आहे.
नाल्या साफ करण्याची मागणी
घोटा देवी : हिंगोली तालुक्यातील घोटा देवी या गावातील नाल्या तुंबल्या आहेत. नाल्या तुंबल्यामुळे नालीतील घाण पाणी रस्त्यांवर येऊन जमा होत आहे. अनेक ठिकाणी घाण पाण्याचे गटारे रस्त्यावर साचले आहे. यामुळे गावात दुर्गंधीमय वातावरण बनले आहे. या दुर्गंधीमुळे अनेक गावकऱ्यांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.
वन्य प्राण्यांचा उपद्रव वाढला
बासंबा : हिंगोली तालुक्यातील बासंबा गावासह शेतशिवारात वन्य प्राणी वावरत आहेत. मागील काही दिवसांपासून उन्हाळ्यासारखी स्थिती झाली असून पाण्याच्या शोधात अनेक वन्य प्राणी गाव शिवारात दिसून येत आहेत. याचबरोबर शेतातील पिकांची नासाडी करत असल्याचे दिसून येत आहे.
वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी
रामेश्वर तांडा : कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा गावाचा वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. मागील दीड महिन्यांपासून गावातील विजेचा अप-डाउनचा खेळ सुरू आहे. तसेच शेतशिवारातील वीज पुरवठा ही खंडित होत असल्याने शेतकऱ्यांच्या शेतीकामातही अडथळा होत आहे. यासाठी गावातील वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
बससेवा सुरू करण्याची मागणी
पोत्रा : कळमनुरी तालुक्यातील पोत्रा परिसरात धावणारी बससेवा बंद पडली आहे. यामुुळे गावकऱ्यांना इतरत्र ठिकाणी जाण्यासाठी खासगी वाहनांचा वापर करावा लागत आहे. खासगी वाहनधारक प्रवाशांकडून जास्त पैसे घेत असल्याने अनेकांना हा प्रवास परवडेनासा झालेला आहे. यामुळे पोत्रा परिसरातील बससेवा सुरू करावी, अशी मागणी गावकऱ्यांतून होत आहे.
पथदिवे सुरू करण्याची मागणी
बासंबा : हिंगोली तालुक्यातील बासंबा गावातील पथदिवे मागील सहा महिन्यांपासून बंद आहे. पथदिवे बंद असल्यामुळे रात्रीच्या वेळी गावात अंधारमय वातावरण होत आहे. अनेक भुरटे चोरटे या अंधाराचा फायदा घेत शेतीपयोगी व संसारोपयोगी साहीत्य चोऱ्या करीत असल्याचे घडत आहे. यासाठी गावातील पथदिवे सुरू करण्याची मागणी होत आहे.