लोकमत न्यूज नेटवर्क, हिंगोली : खाद्यपदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने राज्यात मोहीम राबविण्यात आली असून, भेसळयुक्त पदार्थांचा तब्बल दोन कोटी रुपयांचा साठा जप्त केला असल्याची माहिती या विभागाने दिली.
दिवाळी सणाला सुरुवात झाली असून, या काळात खाद्यपदार्थांत भेसळ करण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने राज्यभरात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत ३५३ अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यातील १९६ आस्थापनांना सुधारणा नोटीस देण्यात आली आहे. या मोहिमेत १ कोटी ९७ लाख ९३ हजार ४२ रुपये किमतीचा भेसळयुक्त साठा जप्त करण्यात आला आहे.
५४ नमुने प्रयोगशाळेत
तपासणीवेळी सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या खवा, स्वीट मावा, गायीचे तूप, खाद्यतेल, दूध, पनीर, बटर, वनस्पती तूप, भगर अशा अन्नपदार्थांचे ६५४ नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. त्यापैकी २१६ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून, १९० नमुने प्रमाणित दर्जाचे, ५ कमी दर्जाचे, ८ मिथ्याछाप आणि १३ असुरक्षित नमुने आढळले आहेत.
शुद्धतेबाबत जागरूकता
अन्नातील भेसळ नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकते. त्यामुळे अन्नपदार्थांची खरेदी करताना उत्पादकाचे नाव, उत्पादन दिनांक, ‘एफएसएसएआय’ परवाना क्रमांक आणि शुद्धतेची खात्री करणे गरजेचे आहे. ग्राहकांनी शुद्धतेबाबत जागरूक राहणे हेच ‘सण सुरक्षिततेचा’ खरा संकल्प असल्याचेही प्रशासनाने नमूद केले.
अभियानांतर्गत कारवाई
अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सण महाराष्ट्राचा संकल्प अन्न सुरक्षितते’चा या अभियानांतर्गत राज्यभरात ही तपासणी मोहीम राबविण्यात आली. सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित आणि शुद्ध अन्न मिळावे, तसेच बाजारात विक्री होणाऱ्या अन्नपदार्थांमध्ये भेसळ होऊ नये, उद्देशाने ही मोहीम राबविण्यात आली, असे अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) स्पष्ट केले.
सणासुदीच्या काळात अन्नातील भेसळीबाबत नागरिकांना शंका आल्यास त्यांनी टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर संपर्क साधावा किंवा नजीकच्या अन्न व औषध प्रशासन कार्यालयात तक्रार नोंदवावी. - सुरेश अन्नपुरे, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन.
Web Summary : To curb food adulteration during Diwali, the FDA seized adulterated food items worth ₹2 crore across Maharashtra. Inspections revealed unsafe samples. Citizens are urged to report suspicions.
Web Summary : दिवाली के दौरान खाद्य पदार्थों में मिलावट रोकने के लिए, एफडीए ने महाराष्ट्र में 2 करोड़ रुपये के मिलावटी खाद्य पदार्थ जब्त किए। निरीक्षण में असुरक्षित नमूने मिले। नागरिकों से संदेह की सूचना देने का आग्रह किया गया है।