शिरडशहापूर ( हिंगोली ) : वसमत तालुक्यातील धामणगाव येथील शेतकऱ्याचे स्वतःच्या शेतातील शेततळ्यात मोटर लावण्यासाठी गेले असता, तोल गेल्याने तळ्यात पडून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना ६ जुलै रोजी घडली आहे.
धामणगाव येथील शेतकरी जळबाजी उर्फ कैलास ज्ञानोबा बेले वय ३७, हे मंगळवारी ४ वाजेच्या सुमारास स्वतःच्या शेतात असलेल्या मोठ्या शेततळ्यातून पिकांना पाणी देण्यासाठी मोटर लावत हाेते. मात्र यावेळी त्यांचा अचानक तोल गेल्याने ते शेततळ्यात पडले. त्यांना पोहता येत नसल्यामुळे त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
शेतातून रात्री उशिरापर्यंत ते घरी आले नसल्यामुळे घरच्यांनी त्यांचा शोध घेतला. परंतु ते कुठे सापडले नाहीत. शेतातील तळ्याकडे पाहिले असता, बाजूला त्यांच्या चप्पल, मोबाईल सापडला. त्यामुळे ते शेततळ्यात पडल्याचे समजून शोधकार्य सुरु केले. तळ्यात जास्तीचे पाणी असल्यामुळे जेसीबी लावून शेततळ्याचा कडा फोडण्यात आला. त्यानंतर त्यांचे प्रेत आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच जमादार प्रकाश नेव्हल यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.