हिंगोली: पुढच्या वर्षी लवकर या... जिल्हाभरात लाडक्या बाप्पाला निरोप; ढोल ताशाच्या तालावर थिरकले गणेशभक्त
By यमेश शिवाजी वाबळे | Updated: September 9, 2022 19:05 IST2022-09-09T19:04:48+5:302022-09-09T19:05:51+5:30
जिल्हाभरात अनंत चतुर्दशीच्या दिवशी 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या'च्या जय घोषात गणेश भक्तांनी लाडक्या गणरायाला निरोप दिला.

हिंगोली: पुढच्या वर्षी लवकर या... जिल्हाभरात लाडक्या बाप्पाला निरोप; ढोल ताशाच्या तालावर थिरकले गणेशभक्त
हिंगोली (रमेश वाबळे ): जिल्हाभरात अनंत चतुर्दशीच्या दिवशी 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या'च्या जय घोषात गणेश भक्तांनी लाडक्या गणरायाला निरोप दिला. विसर्जन मिरवणुकीत ढोल ताशाच्या तालावर गणेशभक्त थिरकताना दिसून आले.
मागील दहा दिवसांपासून गणरायाच्या आगमनामुळे जिल्हाभरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. हिंगोली जिल्ह्यात एकूण १ हजार ३८५ सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेश मूर्तींची स्थापना केली होती. त्याचबरोबर घरोघरीही श्रींच्या मूर्ती स्थापन करण्यात आल्या होत्या. ९ सप्टेंबर रोजी बहुतांश सार्वजनिक मंडळांनी गणेशमूर्तीचे विसर्जन केले. हिंगोली शहरात कयाधू नदी, जलेश्वर तलाव चिरागशहा तलाव अशा तीन ठिकाणी गणेश मूर्तीचे विसर्जन झाले. त्याचबरोबर नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने सात कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात आली होती. या तलावात घरगुती मूर्तींचे विसर्जन झाले.
विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहरांसह जिल्हाभरात पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दुपारी चार वाजेपासून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली होती. शहरातील प्रमुख मार्गावरून ह्या मिरवणुका मार्गस्थ झाल्या. यादरम्यान ढोल ताशांच्या तालावर गणेश भक्त थिरकताना दिसून आले. विसर्जन स्थळी गणेशभक्तांच्या वतीने आरती, पूजा करून 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या'चा जयघोष करीत श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.