संक्रांतीच्या तोंडावरच कुंभार समाजाची उपासमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:18 IST2021-01-13T05:18:38+5:302021-01-13T05:18:38+5:30
हिंगोली : मकरसंक्रांत हा सण कुंभार समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा सण असून, कोरोनामुळे मात्र यावर्षी त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ...

संक्रांतीच्या तोंडावरच कुंभार समाजाची उपासमार
हिंगोली : मकरसंक्रांत हा सण कुंभार समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा सण असून, कोरोनामुळे मात्र यावर्षी त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. शहरात दुकाने थाटली असली तरी दुकानांवर म्हणावे तसे ग्राहक येत नसल्यामुळे गल्लोगल्ली सुगडे विकण्याची वेळ कुंभार समाजावर आली आहे.
कोरोना आजारामुळे मागील आठ महिन्यांपासून कुंभार समाजाचा माठ विक्रीचा व्यवसाय बंदच आहे. त्यामुळे उदरनिर्वाह कसा करावा? लेकरांचे शिक्षण कसे करावे, असा प्रश्न त्यांच्यापुढे पडला आहे. दरवर्षी मकरसंक्रांत महिनाभरावर असता माठ व सुगडे खरेदीसाठी ग्राहकांकडून मागणी होत असे. परंतु, यावर्षी कोरोना आजारामुळे कोणी माठ व सुगड्यांची मागणी केली नाही. यावर्षी सुगड्यांची किंमतही कमी ठेवली आहे. तरीही ग्राहक दुकानांवर येण्यास तयार नाहीत. कोरोना आधी दिवसाकाठी तीनशे रुपये पदरात पडायचे. पण यावर्षी शंभर रुपयेही पदरात पडेनासे झाले आहेत. त्यामुळे कुंभार समाजावर उपासमारीची वेळ आली आहे.
शहरातील गांधी चौक येथे सुगडे व माठ विक्रीसाठी ठेवली आहेत. परंतु, कोरोना आजारामुळे कोणी दुकानांकडे फिरकत नाही. मोजकेच काही ग्राहक माठ व सुगडे खरेदी करीत आहेत. दिवसाकाठी शंभर रुपयेच पदरात पडत आहेत. एवढ्यावर कसा संसार चालवावा, असा प्रश्न पडला आहे. कुंभार समाजाची होत असलेली उपासमार लक्षात घेऊन शासनाने महिन्याकाठी पाच हजार रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी राधेश्याम पेरीया यांनी केली आहे.