एस.टी.च्या कर्मचाऱ्यांचे निवृत्तीनंतरही हाल; म्हातारपणाची रक्कमही मिळता मिळेना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:29 IST2021-07-31T04:29:40+5:302021-07-31T04:29:40+5:30
हिंगोली : सेवानिवृत्तीनंतरही एस. टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची फरफट थांबेना झाली आहे. हक्काचे पैसे असतानाही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना एस. टी. महामंडळाच्या ...

एस.टी.च्या कर्मचाऱ्यांचे निवृत्तीनंतरही हाल; म्हातारपणाची रक्कमही मिळता मिळेना!
हिंगोली : सेवानिवृत्तीनंतरही एस. टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची फरफट थांबेना झाली आहे. हक्काचे पैसे असतानाही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना एस. टी. महामंडळाच्या दारात सकाळ-संध्याकाळ खेटे मारावे लागत आहेत.
इमानेइतबारे महामंडळाची तसेच प्रवाशांची सेवा केल्यानंतर निवृत्तीनंतर हक्काचे पैेसे वेळेवर मिळतील, असे वाटले होते. परंतु, आज निवृत्तीनंतरही वैद्यकीय बिलासह हक्काचे पैसे मिळेना झाले आहेत. सेवानिवृत्तीला दोन-दोन वर्षे उलटून गेले आहेत. अजूनही महामंडळ कसे काय लक्ष देत नाही, हा प्रश्न आता पुढे येऊ लागला आहे. सेवानिवृत्तीधारकांना देण्यासाठी महामंडळाकडे पैसे नाहीत का? महामंडळ तोट्यात आहे का? हे कळायलाही मार्ग नाही. निवृत्तीनंतर भविष्य निर्वाह निधी आणि ग्रॅच्युटीचीही रक्कम अनेक कर्मचाऱ्यांच्या पदरात अजूनही पडली नाही. त्यामुळे त्यांचे नोकरीत असताना आणि सेवानिवृत्तीनंतरही हाल सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. सेवानिवृत्तीनंतरही पैसे पदरात पडत नसल्यामुळे कुटुंबाचा गाडा कसा चालवावा, हा मोठा गंभीर प्रश्न निवृत्तीधारकांपुढे आहे.
जिल्ह्यातील एकूण आगार ०३
जिल्ह्यातील अधिकारी ०७
जिल्ह्यातील कर्मचारी ८५४
बसचालक ३१३
वाहक ३२८
नोकरीत असताना आणि निवृत्तीनंतरही फरफट...
९ सप्टेंबर २०२० रोजी चालक पदावरून सेवानिवृत्त झालो आहे. सर्व कागदपत्रे महामंडळाकडे दिली आहेत. परंतु, अजूनही सेवानिवृत्तीचे पैसे काही पदरात पडले नाहीत. शासनाने आणि एस. टी. महामंडळाने हक्काचे पैसे पदरात टाकावेत, एवढीच विनंती आहे.
- नामदेव बनसोडे, सेवानिवृत्त चालक
सेवानिवृत्तीनंतर हक्काचे पैसे पदरात पडतील, असे वाटले होते. परंतु, हे पैसे अजूनही मिळाले नाहीत. जुलै २०२० मध्ये सेवानिवृत्त झालो आहे. रजेचे आणि कराराचे पैसे राहिलेले आहेत.
- दिनकर गवळी, सेवानिवृत्त वाहतूक नियंत्रक
विचार करायला पाहिजे...
ज्या कर्मचाऱ्यांनी एस. टी. महामंडळाची सेवा प्रामाणिकपणे केली आहे. त्यांचे वैद्यकीय बिल व सेवानिवृत्तीचे हक्काचे पैसे वेळेवर द्यायला पाहिजेत. सेवानिवृत्तीनंतर त्यांची फरफट होता कामा नये. शासनाने आणि एस. टी. महामंडळानेही याचा विचार करावा. हक्काचे पैसे दिल्यास कुटुंबाचा गाडा त्यांना व्यवस्थित चालविता येईल.
- डी. आर. दराडे, विभागीय सचिव, कामगार सेना
पैसे वेळेवर देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत...
कराराच्या फरकातील रक्कम राहिली आहे. सेवानिवृत्तीधारकांना पैसे देण्यासाठी महामंडळस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. वेळोवेळी याबाबत एस. टी. महामंडळाकडून पाठपुरावाही केला जात आहे. शासनालाही याबाबत कळविण्यात आले आहे.
- मुक्तेश्वर जोशी, विभागीय नियंत्रक, परभणी