हिंगोली : कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी औंढा येथील नागनाथ महाविद्यालयातील मतदान केंद्रात केलेला प्रवेश चार पोलीस कर्मचाऱ्यांना चांगलाच भोवला. मतदान केंद्रावर कार्यरत तिघांसह आमदारांच्या अंगरक्षकाच्याही निलंबनाचे आदेश पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी २२ डिसेंबर रोजी काढले आहेत.
नगरपंचायत निवडणुकीसाठी औंढा येथील नागनाथ कनिष्ठ महाविद्यालयात प्रभाग क्रमांक ५ मधील खोली क्रमांक १ मध्ये मतदान केंद्र होते. या केंद्र परिसरात कुरुंदा ठाण्यातील बंडू सीताराम राठोड, तसेच १०० मीटरच्या परिसरात औंढा ठाण्यातील अतुल बोरकर हे दोन पोलीस कर्मचारी कर्तव्यावर होते. तरीही आ. संतोष बांगर हे इतर १३ जणांसह त्यांचे अंगरक्षक तथा पोलीस मुख्यालयात नियुक्ती असलेले डी. के. ठेंगडे यांच्यासमवेत मतदान केंद्रात गेले. त्यांना अटकाव करण्याची त्यांची जबाबदारी असतानाही पक्षाचे चिन्ह प्रदर्शित करीत जाणाऱ्यांना रोखले नाही.
तसेच ही बाब वरिष्ठांनाही कळविली नाही. तसेच प्रभाग क्रमांक २ चे बूथ असलेल्या याच महाविद्यालयातील खोली क्रमांक २ मध्येही ही मंडळी गेली होती. या ठिकाणीही वसमत ग्रामीण ठाण्यातील विजयकुमार जाधव हे कार्यरत होते. त्यांनीही आमदारांचा ताफा रोखला नाही. त्यामुळे या तीन कर्मचाऱ्यांसह आमदारांच्या अंगरक्षकाने कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत पोलीस अधीक्षकांनी त्यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत. बेशिस्त व बेजबाबदार गैरवर्तन केल्याचेही म्हटले आहे.