बसस्थानक परिसरातील अतिक्रमण हटविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:28 IST2020-12-29T04:28:29+5:302020-12-29T04:28:29+5:30
हिंगोली : येथील बसस्थानक परिसरातील अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत चालले होते. बसस्थानकाचे काम रखडले असून, अतिक्रमणामुळे बजबजपुरी निर्माण झाली होती. ...

बसस्थानक परिसरातील अतिक्रमण हटविले
हिंगोली : येथील बसस्थानक परिसरातील अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत चालले होते. बसस्थानकाचे काम रखडले असून, अतिक्रमणामुळे बजबजपुरी निर्माण झाली होती. हिंगोली येथे बसस्थानकासमोर एस. टी. महामंडळाचे व्यापारी संकुल आहे.
या व्यापारी संकुलासमोरच मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे. यापूर्वीही अनेकदा महामंडळाकडून हे अतिक्रमण हटविण्यात आले होते. मात्र वारंवार या ठिकाणी अतिक्रमण करण्यात येते. अनेकांनी या संकुलासमोर शेड टाकले होते. तर काहींनी कापडी मंडप टाकून समोर खुर्च्या टाकून आपल्या मूळ जागेऐवजी बाहेरच जास्त अतिक्रमण केल्याचे दिसून येत होते. त्यामुळे महामंडळाच्या वतीने जेसीबी लावून हॉटेल व्यावसायिकांसह इतर विक्रेत्यांनी समोर निर्माण केलेले अतिक्रमण काढून टाकले आहे. त्याचबरोबर या ठिकाणी महामंडळाच्या जागेत अवैध इतर दुकानेही सुरू झाल्याचे दिसून येत होते. त्यामुळे या ठिकाणी पार्किंगचीही अनेकदा मोठी समस्या उभी राहाते. आता हे अतिक्रमण हटविले असले तरीही पुन्हा काहींनी सायंकाळी समोर खुर्च्या टाकल्याचे दिसून येत होते. त्यामुळे मंडप गेले तरीही जागेवरील अतिक्रमण काही हटले नसल्याचा प्रकार दिसून येत होता. महामंडळाकडून कारवाईत सातत्य नसल्याने या ठिकाणी अतिक्रमणधारकांचे फावत असून सगळीकडूनच ती परिस्थिती निर्माण होत आहे.
या ठिकाणचे अतिक्रमण हटविले असले तरीही बसस्थानकाच्या बांधकामाचे भिजत घोंगडे मात्र कायम आहे. दोन वर्षांपासून हे काम सुरू असले तरीही पूर्ण होण्याचे नाव घेत नाही. संबंधित कंत्राटदाराला महामंडळाकडून का अभय दिले जात आहे, हे कळायला मार्ग नाही. त्यामुळे नागरिकांना मात्र धुळीचे लोट झेलत पर्यायी व्यवस्था केलेल्या शेडमध्ये बसण्याची वेळ आली आहे. याकडेही लक्ष देण्याची मागणी प्रवाशांतून केली जात आहे.