२०० घरांतील मीटर तपासणीत ६० जणांची वीजचोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:24 IST2020-12-25T04:24:29+5:302020-12-25T04:24:29+5:30
वीज ग्राहकांच्या देयकात मोठी तफावत असल्याचे निदर्शनास आल्याने ५० युनिटच्या आतमध्ये अनेक देयके आलेल्या वीज ग्राहकांची यादी महावितरण कार्यालयाकडून ...

२०० घरांतील मीटर तपासणीत ६० जणांची वीजचोरी
वीज ग्राहकांच्या देयकात मोठी तफावत असल्याचे निदर्शनास आल्याने ५० युनिटच्या आतमध्ये अनेक देयके आलेल्या वीज ग्राहकांची यादी महावितरण कार्यालयाकडून काढण्यात आली आहे. त्याठिकाणी होणारी वीज चोरी उघडकीस येत असून, त्यामध्ये प्रामुख्याने मीटरचे न्युट्रल बायपास केल्यामुळे मीटरमध्ये प्रत्यक्ष वापराची नोंद होत नसल्याचे आढळून आले. या प्रकारामुळे महावितरण कंपनीच्या महसुलामध्ये मोठ्या प्रमाणात घट निर्माण होत आहे. त्यामुळे हिंगोली शहरात कमी वापर असणाऱ्या वीज ग्राहकांच्या प्रत्यक्ष मीटरची तपासणी नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता पडळकर, अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव आणि कार्यकारी अभियंता रजनी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता दिनकर पिसे व संबंधित शाखा कार्यालयाचे अभियंता सचिन बेरसले आणि जनमित्र प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासणी करीत आहेत. हिंगोली शहरामध्ये जवळपास २०० वीज ग्राहकांची तपासणी केली असता त्यापैकी प्रामुख्याने मीटरचे वायर बायपास करून वीज वापर करीत असलेले ८० ते ९० ग्राहक आढळून आले आहेत. त्यांच्यावर विद्युत कायदा २००३ कलम १३५ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मीटरच्या वायरला कोणत्याही प्रकारची छेडछाड करू नये तसेच सदर कृत्य हे विद्युत कायदा - २००३ कलम १३५ नुसार अजामीन पात्र गुन्हा आहे, असे महावितरणकडून सांगण्यात आले.