'डोळ्यादेखत भिंतीला तडे गेले'; हिंगोलीस ४.७ रिश्टर स्केलचा धक्का, केंद्रबिंदू पुन्हा पांग्रा शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 09:08 IST2026-04-11T09:07:45+5:302026-04-11T09:08:15+5:30
हिंगोलीत भूगर्भातील हालचाली वाढल्या; सलगच्या हादर्यांमुळे वसमतसह जिल्हाभरात भीतीचे वातावरण.

'डोळ्यादेखत भिंतीला तडे गेले'; हिंगोलीस ४.७ रिश्टर स्केलचा धक्का, केंद्रबिंदू पुन्हा पांग्रा शिंदे
वसमत/हिंगोली: हिंगोली जिल्ह्यासह वसमत तालुक्याला शनिवारी (११ एप्रिल) सकाळी ८:४५ वाजता भूकंपाचा भीषण हादरा बसला. ४.७ रिश्टर स्केल इतकी तीव्रता असलेल्या या धक्क्याने वसमत तालुक्यातील पांग्रा शिंदे गावातील तीन कच्च्या घरांच्या भिंती कोसळून मोठे नुकसान झाले आहे. गेल्या चार महिन्यांतील हा दुसरा मोठा धक्का असल्याने संपूर्ण जिल्ह्यात घवघराट पसरली असून अनेक ठिकाणी घरांना तडे गेले आहेत.
मोठा आवाज अन् जमिनीचा थरकाप
सकाळी नागरिक कामात व्यस्त असताना अचानक भूगर्भातून भीषण आवाज आला आणि जमीन वेगाने हादरू लागली. धक्क्याची तीव्रता इतकी होती की घराघरातील भांडी जमिनीवर कोसळली. जीवाच्या आकांताने नागरिक मुलाबाळांसह घराबाहेर पडले. पांग्रा शिंदे परिसरात सर्वाधिक फटका बसला असून तेथील मातीची घरे कोसळली आहेत. "अचानक घर हलू लागले, आम्ही पळत सुटलो म्हणून वाचलो," अशी भीतीदायक प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिली.
EQ of M: 4.7, On: 11/04/2026 08:45:23 IST, Lat: 19.533 N, Long: 77.202 E, Depth: 10 Km, Location: Hingoli, Maharashtra.
— National Center for Seismology (@NCS_Earthquake) April 11, 2026
For more information Download the BhooKamp App https://t.co/5gCOtjdtw0@DrJitendraSingh@OfficeOfDrJS@Ravi_MoES@GSuresh_NCS@ndmaindiapic.twitter.com/YdkfbOFpT1
प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा
भूकंपाचे धक्के हिंगोली, वसमत, औंढा आणि कळमनुरी या चारही तालुक्यांत तीव्रतेने जाणवले आहेत. या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी नागरिकांना खबरदारीचे आवाहन केले आहे. "नागरिकांनी घाबरून न जाता सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. जुन्या किंवा पडक्या घरांत तसेच तडे गेलेल्या इमारतींमध्ये थांबू नये," असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
८ वर्षांपासूनचा संघर्ष
हिंगोली आणि वसमत परिसरात गेल्या ७ ते ८ वर्षांपासून सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे घरांचे नुकसान होत असून ग्रामस्थांमध्ये कायमस्वरूपी भीती निर्माण झाली आहे. प्रशासनाकडून पाहणी केली जात असली तरी, या समस्येवर ठोस उपाययोजना किंवा सुरक्षित घरांच्या उभारणीसाठी मार्ग काढावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.