खड्ड्यांमुळे एसटी महामंडळाला बसतो नाहक भुर्दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:35 IST2021-09-07T04:35:31+5:302021-09-07T04:35:31+5:30
हिंगोली : जिल्ह्यातील काही रस्ते असे आहेत की ज्या ठिकाणी बस जाऊ पण शकत नाही. वर्षातून पाच ते सहा ...

खड्ड्यांमुळे एसटी महामंडळाला बसतो नाहक भुर्दंड
हिंगोली : जिल्ह्यातील काही रस्ते असे आहेत की ज्या ठिकाणी बस जाऊ पण शकत नाही. वर्षातून पाच ते सहा बसेस खड्ड्यांमुळे बंद कराव्या लागतात, अशी माहिती एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
सद्य:स्थितीत कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ग्रामीण भागातील बसेस बंदच आहेत. जिल्ह्यात हिंगोली, वसमत आणि कळमनुरी असे तीन आगार आहेत. जिल्ह्यात काही ठिकाणी कच्चे रस्ते आहेत तर काही ठिकाणी गिट्टी उखडलेले रस्ते आहेत. त्यामुळे चालकाला बसेस चालवायची झाल्यास ‘तारेवरची कसरत’ करावी लागते. अशा वेळी महामंडळाला नाइलाजाने त्या गावातील बसेस बंद कराव्या लागतात. अजून तरी ग्रामीण भागातील बसेस सुरू करण्यात आलेल्या नाहीत. लांब पल्ल्यांच्या बसेस तेवढ्या सुरू आहेत. पावसाळ्याच्या दिवसात खड्ड्यांत पाणी साचून राहिल्यामुळे बहुतांश खड्डाही दिसत नाही. अशा वेळी बसेसचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन महामंडळाला आर्थिक भुर्दड सहन करावा लागतो.
आगार गतवर्षी सुरू असलेल्या बसेस
हिंगोली २१
वसमत १५
कळमनुरी ८
...तर मार्ग वळवावे लागतात
ग्रामीण भागातील बसेस अजून तरी सुरू नाहीत. परंतु, दरवर्षी खड्ड्यांमुळे बसेसचे मार्ग बदलावे लागतात. अशा वेळी महामंडळाला जास्तीचे डिझेलही लागते. खरे पाहिले तर संबंधित ग्रामपंचायतीने याची दखल घेऊन खड्डे बुजवायला पाहिजेत. रस्ते चकचकीत करायला पाहिजेत, परंतु, कोणीही लक्ष देत नाहीत.
हा मार्ग आहे कच्चा...
जिल्ह्यातील खिल्लार, जयपूर आणि सावरगाव हा मार्ग थोडा कच्चा आहे. पावसाळ्यात या भागात बस जाणे तसे कठीणच असते. प्रवाशांच्या सोयीसाठी बसचालक कसरत करीत बस गावापर्यत घेऊन जातात. परंतु, यामुळे एसटी महामंडळाला आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागते.
प्रतिक्रिया..
कोरोना महामारीमुळे अजून तरी शासनाने ग्रामीण भागात बसेस सोडल्या नाहीत. काही ग्रामपंचायतींनी पत्र दिल्यामुळे त्या ठिकाणी बसेस सुरू केल्या आहेत. प्रवासी संख्या म्हणावी तशी मिळाली नाही तर सुरू केलेल्या बसेसही बंद कराव्या लागतील. बसेस सुरू करण्याबाबत शासनाचा आदेश आल्यास त्या सुरू केल्या जातील.
-संजयकुमार पुंडगे, स्थानकप्रमुख, हिंगोली