चार दिवसांच्या पावसामुळे २१ तलाव भरले तुडुंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:36 IST2021-09-09T04:36:34+5:302021-09-09T04:36:34+5:30

हिंगोली: जिल्ह्यात चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे २६ लघु तलावांपैकी २१ लघु तलाव १०० टक्के तर ५ लघु ...

Due to four days of rain, 21 lakes filled up | चार दिवसांच्या पावसामुळे २१ तलाव भरले तुडुंब

चार दिवसांच्या पावसामुळे २१ तलाव भरले तुडुंब

हिंगोली: जिल्ह्यात चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे २६ लघु तलावांपैकी २१ लघु तलाव १०० टक्के तर ५ लघु तलाव ७५ टक्के भरले आहेत. त्यामुळे रब्बी हंगामातील सिंचनाचा प्रश्न मिटला आहे.

दरवर्षी रब्बी हंगामात सिंचनाचा प्रश्न निर्माण होतो. पावसाळ्याच्या सुरुवातीला कमी पाऊस पडला. यानंतर ४ सप्टेंबरपासून ८ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला आहे. या पावसामुळे २१ तलाव हे तुडुंब भरले गेले आहेत. हिंगोली तालुक्यातील सवड, चोरजवळा, हदगाव, सेनगाव तालुक्यातील पिंपरी, बाभूळगाव, घोरदरी, सवना, कळमनुरी तालुक्यातील कळमनुरी, बोथी, दांडेगाव, देवधरी, औंढा नागनाथ तालुक्यातील वाळकी, सुरेगाव, औंढा नागनाथ, शेंदूरसना, पुरजळ, पिंपळदरी, काकडधाबा, केळी, वंजारवाडी आणि वसमत तालुक्यातील राजवाडी ही २१ लघु तलाव १०० टक्के भरले आहेत.

दुसरीकडे हिंगोली तालुक्यातील वडद, पूर्णा तालुक्यातील मरसूळ हे लघु तलाव ७५ टक्के तर हिंगोली तालुक्यातील हिरडी, पेडगाव, पारोळा हे तलाव ५० टक्क्यांच्या आसपास भरले आहेत.

‘सेल्फी’ काढू नये...

जिल्ह्यातील २१ लघु तलाव शंभर टक्के भरले आहेत. अशावेळी कोणीही तलावाजवळ जाऊन सेल्फी काढू नये. कारण ही जागा सेल्फी काढण्याची नाही. पावसाचे दिवस असल्यामुळे कोणत्याही वेळी तलाव ओसंडून वाहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे तलाव भरले गेल्याने कोणीही पाण्यात उतरुन पोहण्याचा प्रयत्न करु नये.

प्रतिक्रिया...

सन २०२१-२२ या रब्बी हंगामासाठी पाणी भरपूर झाले आहे. २१ लघु तलाव शंभर टक्के भरले आहेत. अशावेळी शेतकऱ्यांनी पशुधनाला सांडव्याच्या शेजारी जाऊ देऊ नये.

-व्ही. बी. पत्की, उपविभागीय अधिकारी

फोटो ४

Web Title: Due to four days of rain, 21 lakes filled up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.