लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : यंदा दिवाळीच्या खरेदीवर दुष्काळाचे सावट असल्याचे चित्र दिसून येत आहे. फटाक्यांसह कापड, किराणा, रेडिमेड फराळांच्या दुकांनावरही म्हणावी तशी गर्दी दिसत नसल्याचे चित्र आहे.दिवाळीच्या पार्श्वभूमिवर नवीन वस्तू खरेदीला सगळेच जण प्राधान्य देतात. शेतकऱ्यांचाही हंगाम घरी आलेला असल्याने दिवाळीच्या मुहुर्तावर मोठी खरेदी केली जाते. लेकीबाळींच्या बोळवणीसाठी कपडा बाजार, सराफा, किराणा दुकानांवर मोठी गर्दी असते. यंदा या ठिकाणीही गर्दी दिसत नाही. विशेष म्हणजे यंदा मोंढ्यातील सोयाबीनची आवकही तेवढी दिसत नाही. त्यामुळे उत्पादन घटल्याने मेटाकुटीला आलेला शेतकरी यंदा दिवाळीत अनावश्यक खर्च टाळत असल्याचे दिसत आहे. एवढेच काय तर फटाका बाजारातही मोठा सन्नाटा पसरला आहे. यंदा अर्धाही माल विकतो की नाही, या चिंतेत विक्रेते आहेत. त्याचबरोबर अजूनही शहरात फटाक्यांचा दणदणाट ऐकायला मिळत नसल्याने यंदाच्या दुष्काळी वातावरणाच्या परिणामाची प्रचिती येत आहे.
दिवाळीच्या खरेदीवर दुष्काळाचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 00:50 IST