आयोगासमोर निवेदनकर्त्यांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 00:32 IST2018-03-08T00:31:51+5:302018-03-08T00:32:43+5:30
मराठा आरक्षणाबाबत राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांना निवेदने देण्यासाठी विविध पक्ष, संघटनांसह मराठा समाजातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. आयोगाला हजारो निवेदने, विविध संस्थांचे ठराव सादर करण्यात आले.

आयोगासमोर निवेदनकर्त्यांची गर्दी
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : मराठा आरक्षणाबाबत राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांना निवेदने देण्यासाठी विविध पक्ष, संघटनांसह मराठा समाजातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. आयोगाला हजारो निवेदने, विविध संस्थांचे ठराव सादर करण्यात आले.
मराठा आरक्षणासंदर्भातील जनसुनावणीसाठी आज हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात राज्य मागास आयोगाचे सदस्य आले होते. त्यामुळे जिल्ह्यातील विविध भागातून आलेल्या नागरिकांनी निवेदने देण्यासाठी एकच गर्दी केली होती. यात मराठा समाजाला आरक्षणाची का गरज आहे, याबाबतच्या निवेदनांचा समावेश होता. तर काहींनी विदर्भातील मराठा कुणबींशी असलेल्या रोटी-बेटीच्या व्यवहाराचा दाखला दिला. या आयोगासमोर निवेदने देण्यासाठी काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी या प्रमुख पक्षांसह इतरही अनेक पक्षांची मंडळी आल्याचे दिसून येत होते. मराठा समाजातील विविध संघटनासह इतरही अनेक संघटनांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी निवेदने सादर केली. या ठिकाणी ग्रामीण भागातून अनेक ग्रामपंचायतींनीही ठराव आणले होते. त्याचबरोबर विविध सामाजिक संस्था, संघटना, सेवाभावी संघटनांनीही निवेदने दिली.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी अनेकांनी संघटनांसह वैयक्तिक पातळीवरही निवेदने दिली. त्यामुळे हजारो निवेदने आल्याचे दिसून येत होते. यात जि.प.सदस्य, नगरसेवक, रिपाइं आठवले गट, भीमशक्ती, मराठा शिवसैनिक सेना, रासप यांच्या वतीनेही शिष्टमंडळाद्वारे निवेदने दिली जात
असल्याचे दिसून आले. तर संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, मराठा महासंघ, युवा प्रतिष्ठान आदींनी निवेदने तर दिलीच; शिवाय पदाधिकारी, कार्यकर्तेही निवेदकर्त्यांना नोंदणीसाठी मार्गदर्शन करताना दिसत होते. दिवसभर ही मंडळी कार्यरत होती.
आयोगाचे सदस्य डॉ.सर्जेराव निमसे, डॉ.राजाभाऊ करपे यांच्यासमक्ष अनेक महिलांनीही आपली मते मांडून निवेदने सादर केली. अनेक ग्रामपंचायतींतर्फेही ठराव आले होते.