नालीतील सांडपाणी रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:53 IST2021-02-05T07:53:20+5:302021-02-05T07:53:20+5:30
विनामास्क वापर वाढला हिंगोली : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाभरातून नागरिक कामानिमित्त येतात. मात्र अनेक नागरिक, कर्मचारी मास्क न लावताच ...

नालीतील सांडपाणी रस्त्यावर
विनामास्क वापर वाढला
हिंगोली : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाभरातून नागरिक कामानिमित्त येतात. मात्र अनेक नागरिक, कर्मचारी मास्क न लावताच कार्यालयात येत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने ठोस उपाययोजना करीत विनामास्क नागरिक, कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.
मोकाट जनावरे रस्त्यावर
हिंगोली : शहरातील नांदेड मार्गावर मोकाट जनावरे ठाण मांडून बसत आहेत. अनेक वेळ जनावरे एकाच ठिकाणी थांबत असल्याने वाहतुकीवर परिणाम होत आहे. जनावरांना बगल देत वाहने न्यावे लागत असल्याने रस्त्याच्या खाली येत आहेत. यामुळे अपघाताची शक्यता निर्माण होत आहे.
दिशादर्शक फलक बसवा
हिंगोली : हिंगोली ते आखाडा बाळापूर दरम्यानच्या महामार्गावरून दिवसभर वाहने धावतात. मात्र या मार्गावरील अनेक पुलाचे कठडे गायब झाले आहेत. त्यात आता दिशादर्शक फलकही गायब झाले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
ग्रामीण भागात चर्चा सरपंचपदाची
हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे आता कोण सरपंच होणार याकडे लक्ष लागले आहे. पॅनलप्रमुख कोणाचे नाव सरपंचपदासाठी पुढे करतील याकडे ग्रामस्थ लक्ष ठेवून आहेत. काही पॅनलप्रमुखांनी तर सदस्यांना सहलीवर रवाना केल्याचेही बोलले जात आहे.
घरकुलाची बांधकामे रखडली
हिंगोली : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत अनेक लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले आहेत. लाभार्थी घरकुल बांधकामासाठी पुढाकार घेत असले तरी बांधकामासाठी वाळू उपलब्ध होत नाही. त्यामुळे वाळूअभावी बांधकामे रखडली आहेत. लाभार्थींना वाळू उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.
मुख्य रस्त्यावर वाहने उभी
वारंगा फाटा : येथून जाणाऱ्या हिंगोली - नांदेड मार्गावरच अनेक चालक वाहने उभी करीत आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण होत आहे. वारंगा फाटा हे महत्त्वाचे ठिकाण असल्याने वाहनांची वर्दळ असते. रस्त्यावर वाहने उभी केली जात असल्याने नागरिकांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे लक्ष देऊन रस्त्यावर वाहने उभी करणाऱ्या चालकांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
दुभाजक टाकण्याची मागणी
हिंगोली : शहरातून जाणाऱ्या नांदेड मार्गावर रेल्वे फाटक ते अकोला बायपासपर्यंत वाहतूक मोठ्या प्रमाणावर असते. एकाच वेळी वाहने या मार्गावरून धावत असल्याने चालकांना कसरत करावी लागत आहे. या मार्गावर दुभाजक टाकल्यास वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.