ड्रेनेज लाईन फुटल्याने डायलेसिस विभागात उपचार घेणे मुश्कील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:35 IST2021-09-07T04:35:29+5:302021-09-07T04:35:29+5:30

हिंगोली : जिल्हा रुग्णालयातील वरच्या मजल्यावरील वॉर्ड क्र. २ वरून आलेली ड्रेनेज लाईन फुटल्यामुळे डायलेसिस विभागासमोर घाण पाणी साचले ...

Drainage line rupture makes it difficult to seek treatment in the dialysis department | ड्रेनेज लाईन फुटल्याने डायलेसिस विभागात उपचार घेणे मुश्कील

ड्रेनेज लाईन फुटल्याने डायलेसिस विभागात उपचार घेणे मुश्कील

हिंगोली : जिल्हा रुग्णालयातील वरच्या मजल्यावरील वॉर्ड क्र. २ वरून आलेली ड्रेनेज लाईन फुटल्यामुळे डायलेसिस विभागासमोर घाण पाणी साचले जात आहे. कुजलेले अन्न व ड्रेनेजच्या पाण्यामुळे रुग्णांना तसेच उपचार करणाऱ्या कर्मचाऱ्यांंनाही या घाणीचा त्रास होत आहे. अर्ज-विनंती करूनही काही उपयोग होत नाही, अशी तक्रार काही रुग्णांनी केली आहे.

१ जानेवारी २०१४ रोजी जिल्हा रुग्णालयात डायलेसिस विभागाची स्थापना करण्यात आली आहे. आजपर्यंत १३ हजार ३५० रुग्णांनी या विभागात उपचार घेतले आहेत. या विभागात किडणी विकारतज्ज्ञ १, वैद्यकीय अधिकारी १, परिसेविका १, डायलेसिस तंत्रज्ञ ३, अधिपरिसेविका ३ आणि सेवक २ असे कर्मचारी काम करतात. मागच्या वीस दिवसांपासून एका वॉर्डची ड्रेनेज लाईन फुटली आहे. त्यामुळे हे पाणी सरळ डायलेसिस विभागाजवळ येऊन पडते. त्यामुळे डायलेसिस विभागातील रुग्ण तसेच कर्मचाऱ्यांना नाकाला रुमाल बांधून बसावे लागते. वाऱ्याची झुळूक आली की, दुर्गंधी हॉलमध्ये येते. याबाबत अनेक वेळा रुग्ण तसेच नातेवाइकांनी संबंधितांकडे तक्रार दिली आहे. परंतु, अजून तरी कोणीही लक्ष दिले नाही, असे रुग्णांच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे.

आतापर्यंत उपचार घेतलेले रुग्ण....

२०१३-१४ मध्ये ३०, २०१४-१५ मध्ये १०५१, २०१५-१६ मध्ये १६४०, २०१६-१७ मध्ये १६५७, २०१७-१८ मध्ये २१६८, २०१८-१९ मध्ये २०६७ आणि २०२०-२१ मध्ये १९०७ रुग्णांनी उपचार घेतले आहेत.

कॉट संख्या वाढविण्याची मागणी...

जिल्हा रुग्णालयातील डायलेसिस विभागाचा वॉर्ड लहान आहे. त्यामुळे येथे उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी तो अडचणींचा ठरत आहे. हा विभाग पूर्वी वॉर्ड क्र. २ म्हणजे वरच्या मजल्यावर होता. काही दिवसांनी हा वॉर्ड बदलून खाली आणण्यात आला आहे. आजमितीस या विभागात चारच कॉट ठेवण्यात आले आहेत. एखादा रुग्ण जर वाढला तर त्यास बेंचवर झोपवले जाते. एखादा रुग्ण बरा झाला तर दुसऱ्या रुग्णास त्या ठिकाणी दाखल करून उपचार केला जातो.

ड्रेनेज लाईनबाबत सूचना केली आहे...

ड्रेनेज लाईन दुरुस्तीबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिले आहे. डायलेसीस विभागासमोरील घाण व फुटलेला पाईप तातडीने दुरुस्त केला जाईल. रुग्णांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची काळजी जिल्हा रुग्णालय घेत आहे. रुग्णांंना काही अडचणी असतील तर त्यांनी जिल्हा व्यवस्थापनाला कळवाव्यात.

- डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक

Web Title: Drainage line rupture makes it difficult to seek treatment in the dialysis department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.