जिल्हास्तरीय युवा महोत्सव ऑनलाईन पध्दतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:39 IST2020-12-30T04:39:13+5:302020-12-30T04:39:13+5:30
हिंगोली : क्रीडा व सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने २८ डिसेंबर रोजी ...

जिल्हास्तरीय युवा महोत्सव ऑनलाईन पध्दतीने
हिंगोली : क्रीडा व सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने २८ डिसेंबर रोजी जिल्हा क्रीडा संकुल, लिंबाळा मक्ता याठिकाणी २०२० - २१ या जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयाेजन करण्यात आले होते. डॉ. कल्याण कदम यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी कलीमोद्दीन फारुकी, मुख्याध्यापक अनुशील इंगोले यांची उपस्थिती होती.
काेविड महामारीच्या प्रादुर्भाव काळात यावर्षी शासनामार्फत प्राप्त सुचनांनुसार युवा महोत्सव ऑनलाईन घेण्यात आला. यामध्ये एकूण ६५ कलाकारांनी सहभाग नोंदविला होता. यात सांघिक लोककला प्रकारात लोकनृत्य, लोकगीत, शास्त्रीय वाद्य, कला प्रकारात मृदंग, तबला, हार्मोनियम इत्यादी कला प्रकारांमध्ये कलाकारांनी आपल्या कलेचे ऑनलाईन पध्दतीने सादरीकरण केले.
यातील विजयी स्पर्धकांना औरंगाबाद येथे ३० डिसेंबर रोजी होणाऱ्या विभागीय युवा महोत्सवामध्ये ऑनलाईन पध्दतीने सहभाग नोंदवता येणार आहे.
लोकगीत प्रकारात नागनाथ महाविद्यालय, औंढा येथील संघ विजयी ठरला आहे. तसेच लोकगीतमध्ये स्व. माधवराव नाईक महाविद्यालय, कळमनुरी संघ विजयी ठरला आहे. वैयक्तिक कला प्रकारामध्ये शास्त्रीय वाद्य तबला या प्रकारात विशाल घोंगडे व मृदंग या कला प्रकारात कृष्णा राखोंडे आणि हार्मोनियम या कला प्रकारात राहुल कांबळे हे विजयी ठरले आहेत. यामध्ये मुख्य परीक्षक संजय मुलगीर यांच्यासह गजानन पाठक, प्रा. डॉ. सुनील कांबळे, विजय जोशी, कैलास नाईक, नंदकुमार जावळे यांनी परीक्षण केले. युवा महोत्सव यशस्वी करण्यासाठी क्रीडा अधिकारी मारोती सोनकांबळे, संतोष फुपाटे, यांच्यासह आनंद सुरेकर, जयवंत आसोले, अमोल मुसळे, शेख वसीम, शेख सिकंदर, अर्जुन पवार इत्यादी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.