Dhande Pimpri Khu. Proved to be infected with bird flu here | धांडे पिंपरी खु. येथे बर्ड फ्लूची लागण झाल्याचे सिद्ध

धांडे पिंपरी खु. येथे बर्ड फ्लूची लागण झाल्याचे सिद्ध

आजपासून परिसरातील कोंबड्या नष्ट करणार

आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर नजीक असलेल्या धांडे पिंपरी खु. येथील मृत कोंबड्यांचे अहवाल प्राप्त झाले असून कोंबड्यांना बर्ड फ्लू ची बाधा झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता परिसरात एकच खळबळ उडाली असून प्रशासनाच्यावतीने परिसरातील कोंबड्या नष्ट करण्याचे काम हाती घेतले आहे.

धांडे पिंपरी खु. येथील एका शेतकऱ्याच्या पोसलेल्या ३० कोंबड्यांपैकी २४ कोंबड्या पहिल्या दिवशी अज्ञात रोगाची लागण झाल्याने मरण पावल्या. तर दुसऱ्या दिवशी २ कोंबड्या मरण पावल्या. अचानक कोंबड्यांचा मृत्यू झाल्यामुळे ही बाब पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना कळविण्यात आली. त्यानंतर त्यांचे पथक धांडे पिंपरी गावात येऊन मृत कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी घेऊन गेले. इतर मृत कोंबड्यांना खोल खड्ड्यात पुरून टाकण्यात आले. मृत कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी भोपाळ प्रयोगशाळेत पाठविले होते. २१ जानेवारी रोजी त्या कोंबड्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

यापूर्वीच जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी धांडे पिंपरी परिसरातील दहा किलोमीटर परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित केला होता. बर्ड फ्लू ची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर प्रशासन सतर्क झाले असून २२ जानेवारीपासून परिसरातील इतर कोंबड्या नष्ट करण्याचे काम हाती घेतले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे. बर्ड फ्लूची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले असले तरीही नागरिकांनी घाबरून जाऊ नये. प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहेत. नागरिकांनीही त्याला साथ द्यावी.

परिसरातील कोंबड्यांची खरेदी विक्री, पशुधनाची ने- आण या सर्वांवर कटाक्षाने बंधने पाळावीत असेही आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले. बाळापूर परिसरात बर्ड फ्लूची लागण झाल्यामुळे परिसरामध्ये एकच खळबळ माजली असून आता यावर काय उपाययोजना करावी अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे. आपल्या भागात पहिल्यांदाच बर्ड फ्लूची लागण झाल्यामुळे माणसांना या पासून काय अपाय होतील याबाबतही चर्चा झडत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

चौकट

गावात फवारणी पूर्ण केली - पोलीस पाटील रमेश धांडे

धांडे पिंपरी गावामध्ये अज्ञात रोगाने कोंबड्यांचा मृत्यू झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी परिसरात अलर्ट झोन घोषित केला. त्यानंतर गावात सर्वत्र निर्जंतुकीकरणाची फवारणी करण्यात आली असल्याची माहिती गावचे पोलीस पाटील रमेश धांडे यांनी दिली आहे.

चौकट

प्रतिबंधित क्षेत्र घोषित केल्यानंतरही चिकन सेंटर तेजीत

धांडे पिंपरी गावाच्या परिसरात १० किलोमीटरचे अंतरातील परिसर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले. १७ जानेवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश पारित केले. परंतु त्याची अंमलबजावणी मात्र होत नसल्याचे दिसून येत आहे. आखाडा बाळापूर येथील सर्व चिकन सेंटर आजही २१ जानेवारी राेजी तेजीत सुरू असल्याचे दिसून आले. याप्रकरणी पोलीस व महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. परंतु या आदेशाची अंमलबजावणी कोणी करायची याबाबतच ते अधिकारी अनभिज्ञ असल्याचे दिसून आले.

Web Title: Dhande Pimpri Khu. Proved to be infected with bird flu here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.