मानव विकास मिशनच्या बस सोडण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:53 IST2021-02-05T07:53:17+5:302021-02-05T07:53:17+5:30
काटेरी झुडपे बनली धोकादायक हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील कामठा फाटा ते गोटेवाडी मार्गावर काही ठिकाणी काटेरी झुडपे रस्त्यालगत येत ...

मानव विकास मिशनच्या बस सोडण्याची मागणी
काटेरी झुडपे बनली धोकादायक
हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील कामठा फाटा ते गोटेवाडी मार्गावर काही ठिकाणी काटेरी झुडपे रस्त्यालगत येत आहेत. काटेरी झुडपांच्या फांद्या रस्त्यावर येत असल्याने वाहनचालकांना लागून जखमी व्हावे लागत आहे. या मार्गावरील काटेरी झुडपे छाटून टाकावीत अशी मागणी होत आहे.
गौण खनिजाचे उत्खनन वाढले
हिंगोली : तालुक्यातील अनेक गावात गौण खनिज उत्खनन वाढत आहे. उत्खनन करण्यासाठी कोणताही परवाना न घेताच वाहतूक केली जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. यातून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. अवैध उत्खनन करणाऱ्यांचा शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
हरभरा काढणीस सुरुवात
हिंगोली : कळमनुरी तालुक्यात बहुतांश शेतकऱ्यांनी हरभरा पीक घेतले आहे. सध्या हे पीक काढणीस आले असून काही शेतकरी हरभरा पिकाची काढणी करीत आहेत. यावर्षी हरभरा पिकाच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत.
नेटवर्कच्या त्रासाला ग्राहक वैतागले
हिंगोली : ग्रामीण भागात खासगी कंपनीचे मोबाईल सीमधारक मोठ्या प्रमाणावर आहेत. मात्र, सर्वच कंपन्यांचे नेटवर्क गायब होत आहे. दूरसंचारच्या नेटवर्कला कंटाळून ग्राहक खासगी कंपनीकडे वळले होते. आता खासगी कंपन्यांचे नेटवर्कही गायब होत असल्याने ग्राहक दुहेरी संकटात सापडले आहेत. किमान आता दूरसंचारची सुविधा सुरू करून ग्राहकांना नेटवर्क उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे.
दुभाजकावरील शोभेची झाडे फुलली
हिंगोली : शहरातील अग्रसेन चौक ते इंदिरा गांधी चौक दरम्यानच्या दुभाजकावर नगरपालिकेच्यावतीने वृक्षारोपण करण्यात आले होते. या रोपट्यांना नियमित पाणी दिले जात असल्याने झाडे आता चांगल्या स्थितीत आहेत. झाडे हिरवीगार झाल्याने वाहनचालकांचे लक्ष वेधून घेत आहेत. तसेच प्रदूषणही टाळण्यास मदत होत आहे.
भरधाव वाहनाने धोका वाढला
हिंगोली : शहरातील काही मार्गांवर दुचाकी चालक भरधाव वाहने चालवित आहेत. यामध्ये अनेक जणांकडे वाहन चालविण्याचा परवाना नसतानादेखील वाहने चालवित असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. तसेच वाहतुकीच्या नियमांचे पालनही होत नसल्याचे पहावयास मिळत आहे. भरधाव वाहने चालविणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
रेल्वे फाटकात अडकले वाहन
हिंगोली : येथील नांदेड मार्गावर रेल्वे रूळावर फाटक बसविण्यात आले आहे. रेल्वे आल्यानंतर दोन्ही बाजूची फाटक बंद केली जातात. तरीही काही वाहनचालक फाटकाखालून वाहने नेण्याचा प्रयत्न करीत आहेत. २० जानेवारी रोजी सकाळी अकराच्या सुमारास फाटक बंद होत असताना एक वाहन जाण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, वेळीच ही बाब लक्षात आल्याने पुन्हा काही सेकंद फाटक उघडून वाहनाला बाहेर काढले. असे प्रकार नेहमीच घडत आहेत.