२९ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत संचारबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:28 IST2021-03-28T04:28:29+5:302021-03-28T04:28:29+5:30

हिंगोली : कोरोनाचा कहर वाढताच जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिनांक २९ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान ७ दिवसांची संपूर्ण संचारबंदी ...

Curfew from March 29 to April 4 | २९ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत संचारबंदी

२९ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत संचारबंदी

हिंगोली : कोरोनाचा कहर वाढताच जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिनांक २९ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान ७ दिवसांची संपूर्ण संचारबंदी घोषित केली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांचा आकडा रोजच शंभरवर राहात असून, मृत्यूही वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने अखेर संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

हिंगोली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असली, तरीही नागरिक मात्र त्या तुलनेत काळजी घेत नसल्याचे दिसून येत होते. त्याचा परिणाम म्हणून जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्या आता सव्वा सहाशेच्याही पुढे गेली आहे. आता या रुग्णांना योग्य सेवा देताना आरोग्य विभागाची दमछाक होत आहे. अपुऱ्या यंत्रणेवर आरोग्य विभागाकडून रुग्णसेवा केली जात आहे. मात्र, यापेक्षा जास्त रुग्ण वाढले तर जिल्ह्यात अवघड परिस्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने खबरदारी म्हणून पुन्हा दिनांक २९ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान संचारबंदी घोषित केली आहे. जिल्ह्याच्या हद्दीतील सर्व आस्थापना, दुकाने, खानवळी, आदी २९ मार्चच्या सकाळी ७ वाजल्यापासून ते ४ एप्रिलच्या रात्री १२ वाजेपर्यंत बंद राहणार आहेत. या कालावधीत दूध विक्री केंद्र, दूध विक्रेते यांना सकाळी ७ ते १० यावेळेत घरपोच सेवा देण्याची मुभा दिली आहे. शिवाय जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, बँका या कामकाजासाठी चालू राहतील. या कालावधीत बँका केवळ शासकीय कामकाजासाठी चालू राहतील. याकरिता संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना ये-जा करण्यासाठी मुभा राहील. परंतु, सोबत ओळखपत्र ठेवणे बंधनकारक राहणार आहे. औषध दुकानेही चालू ठेवण्यास मुभा राहील. पत्रकार व त्यांच्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांनाही ओळखपत्र ठेवून वार्तांकनाची मुभा आहे. रस्त्यांची कामे, महावितरण, महापारेषणची कामे, पाणीपुरवठा, दूरसंचारची कामे, स्वच्छता, परवानगीप्राप्त वाळू घाटातून वाळू वाहतुकीला मुभा राहणार आहे. पेट्राेल पंप सुरू राहणार असले, तरीही केवळ शासकीय वाहने व अत्यावश्यक सेवा देणारी वाहने व कृषी सेवा संबंधित वाहनांनाच इंधन पुरवठा केला जाईल. संचाराची मुभा दिलेल्या व्यक्तिंना सामाजिक अंतर, मास्क वापरणे बंधनकारक राहील.

याशिवाय इतर कोणीही रस्त्याने, बाजारामध्ये गल्लीत, गावामध्ये, घराबाहेर फिरताना आढळल्यास त्याच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल, असा इशाराही या आदेशात देण्यात आला आहे.

शाळा, महाविद्यालये, मंगल कार्यालये, प्रवास बंद

संचारबंदीच्या या कालावधीत सर्व धार्मिक/प्रार्थनास्थळे, शाळा, महाविद्यालये, सर्व मंगल कार्यालये, लॉन्स बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. मात्र, बाहेरील विद्यार्थी, परजिल्ह्यातील येथे अडकलेले नागरिक यांच्यासाठी परवानाधारक खानावळ, हॉटेल्स केवळ पार्सल सुविधेसाठी सकाळी ९ ते रात्री ७ यावेळेत उघडण्यास मुभा राहणार आहे. लग्न सोहळाही आयोजित करता येणार नसून, फक्त कोर्ट मॅरेजसाठी मुभा देण्यात आली आहे. प्रवासी बस वाहतुकीला जिल्हांतर्गत बंदी राहणार असून, इतर जिल्ह्यातून येणाऱ्या बसेसला मुभा असली, तरीही त्या फक्त बसस्थानकातच थांबतील. ई-काॅमर्स व कुरियर सेवा देण्यासही जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे.

महिन्यात दुसऱ्यांदा टाळेबंदीमार्च महिन्याच्या सुरुवातीलाच रुग्ण वाढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी टाळेबंदी जाहीर केली होती. त्यावेळी फक्त अडीचशे सक्रिय रुग्ण होते. आता सक्रिय रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे ऐन ‘मार्च एंड’च्या तोंडावर पुन्हा एकदा टाळेबंदी झाली आहे.

Web Title: Curfew from March 29 to April 4

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.