हिंंगोली : शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक शाखेच्यावतीने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईची मोहीम हाती घेण्यात येणार आहे, त्यामुळे शहरातील गर्दीच्या ठिकाणी वाहनांसाठी पार्किंग झोन तयार करावेत, बाजारपेठेत प्रवेश करणाऱ्या रस्त्यांवर लोखंडी खांब उभारून द्यावेत, अशी मागणी शहर वाहतूक शाखेने नगरपालिकेकडे केली आहे.
हिंगोली शहरातील गांधी चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक व गांधी चौक ते जवाहर रोड तसेच खुराणा पेट्रोल पंप रोड, टेलिफोन कार्यालय, बसस्थानक, नांदेड नाका, बावनखोली रोड आदी ठिकाणी नागरिकांची गर्दी होते. अनेक नागरिक वाहने रस्त्यावरच उभी करीत आहेत. त्यामुळे वाहतूक विस्कळीत होत आहे, तसेच शहरातील बसवेश्वर स्तंभ, पलटण, मस्जिद रोड, एसबीआय बँक रोड, विश्रामगृह रोडसमोरील रोड, खुराणा पेट्रोलपंप रोड भागातील व्यापारी दुकानासमोरच उंच जड वाहने उभी करून माल उतरवित आहेत. याचा नागरिकांना त्रास होत आहे. शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी शहरातील गर्दीच्या ठिकाणी पार्किंग झोन तयार करावेत, तसेच जड वाहने बाजारपेठेत येणार नाहीत, यासाठी या रस्त्यावर लोखंडी आडवी उभी कमान उभारून द्यावी, अशी मागणी हिंगोली शहर वाहतूक शाखेने नगरपालिकेकडे केली आहे.
वाहतूक शाखा राबविणार कारवाईची मोहीम
येथील शहर वाहतूक शाखा वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईची मोहीम राबविणार आहे. दररोज विनापरवाना, ट्रिपल सीट, वाहनांवर नंबर नसणे, विना कागदपत्रे असणाऱ्यांची तपासणी होणार आहे. तसेच वाहनांवर पूर्वी लावलेला दंडही वसूल केला जाणार आहे. विशेष माेहिमेत नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जाणार असल्याचे सूत्राने सांगितले.