विनाकारण फिरणाऱ्यांची दुसऱ्या दिवशीही कोरोना चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:28 IST2021-04-18T04:28:47+5:302021-04-18T04:28:47+5:30

हिंगोलीत पोलीस दलाकडून वारंवार सूचना दिल्यानंतरही विनाकारण फिरणारे काही कमी होत नाहीत. त्याचा परिणाम म्हणून शहरातील सर्वच रस्त्यांवर संचारबंदीसारखी ...

Corona testing of unruly walkers the next day as well | विनाकारण फिरणाऱ्यांची दुसऱ्या दिवशीही कोरोना चाचणी

विनाकारण फिरणाऱ्यांची दुसऱ्या दिवशीही कोरोना चाचणी

हिंगोलीत पोलीस दलाकडून वारंवार सूचना दिल्यानंतरही विनाकारण फिरणारे काही कमी होत नाहीत. त्याचा परिणाम म्हणून शहरातील सर्वच रस्त्यांवर संचारबंदीसारखी कोणतीच परिस्थिती दिसत नाही. सुसाट वेगाने जाणारी वाहने पोलिसांना वाकुल्या दाखवत आहेत की काय? असे चित्र आहे. याला चाप बसण्यासाठी पोलिसांनी कालपासून विनाकारण फिरणाऱ्यांना पकडून थेट त्यांची कोरोना चाचणी करण्याची मोहीम सुरू केली आहे. काल अग्रसेन चौकात ही मोहीम राबविली. आज हे चाचणी केंद्र इंदिरा गांधी चौकात हलविले. त्यामुळे आज कालच्यापेक्षा जास्त लोक जाळ्यात अडकल्याचे दिसून येत होते. या ठिकाणी वाहनचालकांना अडविल्यावर ते पोलिसांशी आधी वाद घालत असल्याचे दिसत होते. अनेक अस्थापना बंद असताना इतर कामे सांगून पळवाटा शोधणाऱ्यांना मात्र पोलिसांनी पकडून त्यांची कोरोना चाचणी करून घेतली.

दुचाकी, चारचाकी, खाजगी प्रवासी वाहतूक करणारी वाहने अशा कोणालाच पोलिसांनी सोडले नाही. विशेष म्हणजे या ठिकाणी खुद्द पोलीस अधीक्षक उभे राहत असल्याने पोलीस यंत्रणाही दक्ष होती. पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे शहर ठाण्यातील कर्मचारीही या ठिकाणी मदतीला उभे होते. ऐकत नसलेल्यांना धरून चाचणीसाठी नेले जात होते.

एकाच वेळी चार चौकांत तपासणी व्हावी

शहरातील एकाच चौकात ही मोहीम राबिविली जात आहे. त्यामुळे या ठिकाणी ग्रामीण भागातून आलेलेच जास्त चाचणीच्या घेऱ्यात येत आहेत. शहरातील अनेक उपटसुंभ या बाबीचा कानोसा घेत पर्यायी रस्त्यांचा वापर करून या तपासणीपासून स्वत:चा बचाव करीत आहेत. त्यामुळे एकाच वेळी शहरात चार ठिकाणी अशी तपासणी करून व्यवस्थित कोंडी केली तर नाहक फिरणारे उद्यापासून रस्त्यावर दिसणार नाहीत, हेही तेवढेच खरे.

Web Title: Corona testing of unruly walkers the next day as well