बसस्थानकाचे बांधकाम पूर्ण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:53 IST2021-02-05T07:53:02+5:302021-02-05T07:53:02+5:30
मुख्य रस्त्यावरच वाहने उभी हिंगोली : येथील नांदेडकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर प्रवासी वाहने उभी केली जात आहेत. येथून मोठ्या ...

बसस्थानकाचे बांधकाम पूर्ण करा
मुख्य रस्त्यावरच वाहने उभी
हिंगोली : येथील नांदेडकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर प्रवासी वाहने उभी केली जात आहेत. येथून मोठ्या प्रमाणावर वाहने धावत असताना मुख्य रस्त्यावरच वाहने उभी करण्याची स्पर्धा लागत आहे. त्यामुळे इतर वाहनचालकांना वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
किलोमीटर नोंदीचे दगड गायब
हिंगोली : हिंगोली ते नांदेड मार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. काम करताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी असलेले अनेक ठिकाणचे किलोमीटर नोंदीचे दगड निघत आहेत. यामुळे परराज्यातील वाहनचालकांना प्रवास अंतराचा अंदाज लागत नसल्याचे चित्र आहे. मोठ्या शहराचे अंतर किती किलोमीटरवर आहे, याचा अंदाज लागत नसल्याने चालकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.
ओढ्यांतील वाळू उपसा वाढला
कळमनुरी : तालुक्यात ओढ्यांची संख्या मोठी आहे. सध्या नदी घाटावरील वाळू उपसा करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्यामुळे वाळूमाफिया ओढ्यांतील वाळू उपसा करण्याकडे वळले आहेत. ओढ्यांतील वाळू उपशाकडे महसूल कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने वाळूमाफियांचे फावत आहे. याकडे लक्ष देऊन या वाळू उपशावर प्रतिबंध घालावा, अशी मागणी होत आहे.
जनता बस नसल्याने प्रवाशांची गैरसोय
हिंगोली : येथून नांदेडकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. तसेच या मार्गावरील गावांतूनही प्रवासी मोठ्या शहरात जातात. मात्र, खेडेगावातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी साधी बस, जनता बस सुरू नाही, परिणामी जलद बसने प्रवास करावा लागत आहे. यासाठी कळमनुरी अथवा आखाडा बाळापूर, वारंगा येथे यावे लागत आहे. या मार्गावर जनता बस सुरू करावी, अशी मागणी होत आहे.
वृक्षलागवड करण्याची गरज
हिंगोली : जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाभरात वृक्षारोपण करण्याचा प्रयत्न केला जातो. दरवर्षी वृक्षलागवड मोहीम हाती घेण्यात येते. मात्र, वृक्ष लागवडीनंतर यातील बहुतांश रोपटे वाळून जात आहेत. त्यामुळे वृक्षलागवडीचा हेतू साध्य होत नसल्याचे दिसून येत आहे. तसेच वृक्षतोडही होत असल्याने झाडांची संख्या कमी होत आहे. यासाठी वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाई करत वृक्षलागवड करावी, तसेच रोपटे जतन करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.
ओढे, नाले आटले
हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील ओढे, नाले आटले असून पाणीपातळी खालावत आहे. यामुळे वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाण्याच्या शोधात वन्यप्राणी मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. यातून वन्यप्राण्यांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. यासाठी माळरानावर पाणवठे उभारावेत, अशी मागणी होत आहे.
बालकांनी जोपासले विविध छंद
हिंगोली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. अंगणवाड्याही बंद ठेवण्यात आल्या होत्या. आता पाचवी ते आठवी, तसेच नववी ते बारावीपर्यंत वर्ग सुरू झाले असले तरी पहिली ते चौथीचे वर्ग व अंगणवाड्या अद्याप बंद आहेत. त्यामुळे बालकांना अद्याप घरीच राहावे लागत आहे. दिवसभर खेळून कंटाळत असल्याने लहान बालके पोहणे, चित्रकला, सायकल चालविणे आदी छंद जोपासत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.