नाल्या बांधण्याची नागरिकांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:28 IST2020-12-29T04:28:53+5:302020-12-29T04:28:53+5:30
हिंगोली: शहराच्या जवळ असलेल्या गंगानगर येथे नाल्या नसल्यामुळे पाणी रस्त्यांवर येत आहे. परिणामी डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांना ...

नाल्या बांधण्याची नागरिकांची मागणी
हिंगोली: शहराच्या जवळ असलेल्या गंगानगर येथे नाल्या नसल्यामुळे पाणी रस्त्यांवर येत आहे. परिणामी डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाने याची दखल घेऊन या भागामध्ये नाल्या बांधाव्यात, अशी मागणी होत आहे.
विजेचा लपंडाव; पिकांचे नुकसान
आखाडा बाळापूर: कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर व परिसरात मागील पंधरा दिवसांपासून विजेचा लपंडाव नित्याचाच झाला आहे. वीज खंडित होत असल्यामुळे विहिरींना पाणी असूनसुद्धा गहू, हरभरा आदी पिकांना देता येत नाही. त्यामुळे पिके कोमेजून जात आहेत. महावितरण कंपनीच्या वरिष्ठांनी वेळीच लक्ष देवून वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे.
पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याची मागणी
आंबाचोंडी: मार्च २०२९ पासून वसमत तालुक्यातील आंबाचोंडी येथील रेल्वेसेवा बंद आहे. त्यामुळे प्रवाशांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वे नसल्यामुळे अवैध वाहनांचा सहारा घ्यावा लागत आहे. आंबाचोंडी येथून धावणाऱ्या पूर्णा ते अकोला, परळी ते अकोला, मुदखेड ते अकोला, अकोला ते परळी या पॅसेंजर रेल्वे त्वरित सुरू करून प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी या भागातील प्रवाशांनी केली आहे.
रस्त्यांवर खड्डे; वाहनचालक त्रस्त
हिंगोली: शहरातील शाहूनगर, कमलानगर, इंदिरानगर आदी नगरांमधील रस्ते पूर्णत: उखडले आहेत. त्यामुळे वाहनांचे अतोनात नुकसान होत आहे. खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. या बाबीची संबंधित विभागाने दखल घ्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
जिल्ह्यात तूर कापणीला आला वेग
डिग्रस कऱ्हाळे: हिंगोली तालुक्यातील डिग्रस व परिसरात गत दोन दिवसांपासून तूर कापणीला वेग आला असून शेतकरी तूर कापणीत व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. यावर्षी जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांची तूर होरपळून गेली आहे. गतवर्षी तुरीचे उत्पन्न चांगले होते. यावर्षी मात्र पावसामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.
नरसी ते एमआयडीसी रस्त्याचे काम सुरू
हिंगोली: तालुक्यातील नरसी फाटा ते लिंबाळा या पाच किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे काम चार दिवसांपासून सुरू केले आहे. दोन्ही बाजूंनी रस्ता उखडून ठेवला असून धुळीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाहनचालक व पादचाऱ्यांंना त्रास होत आहे. संबंधित विभागाने काम करताना पर्यायी रस्त्यावर पाणी टाकावे, अशी मागणी सर्वसामान्यांतून होत आहे.
बसस्थानकातील खड्ड्यांचा प्रवाशांना त्रास
आखाडा बाळापूर: कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील बसस्थानकात मागील काही दिवसांपासून खड्ड्यांचे प्रमाण वाढले आहे. तसेच धूळही वाढली आहे. त्यामुळे प्रवाशांना अतोनात त्रास होत आहे. वेळोवेळी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आले, परंतु अद्यापतरी कोणीही लक्ष दिलेले नाही. बसस्थानकाती खड्डे बुजवून धुळीचे प्रमाण कमी करावे, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
अवैध प्रवासी वाहतुकीचा अडथळा
आखाडा बाळापूर: येथील बसस्थानकासमोर मागील काही दिवसांपासून अवैध प्रवासी वाहने अस्ताव्यस्त उभी केली जात आहेत. त्यामुळे रहदारीस अडथळा होत आहे. शहर वाहतूक शाखेने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.