सिनेमा स्टाईल चोरीचा पोलिसांना लागला सुगावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:18 IST2021-01-13T05:18:51+5:302021-01-13T05:18:51+5:30
कुरुंदा येथील राजकुमार किराणा दुकानाचे व्यापारी प्रल्हाद गुळगुळे हे बँकेत पैसे भरण्यासाठी मुख्य रस्त्याने पायी बँकेकडे जात होते. अचानकपणे ...

सिनेमा स्टाईल चोरीचा पोलिसांना लागला सुगावा
कुरुंदा येथील राजकुमार किराणा दुकानाचे व्यापारी प्रल्हाद गुळगुळे हे बँकेत पैसे भरण्यासाठी मुख्य रस्त्याने पायी बँकेकडे जात होते. अचानकपणे समोरून दुचाकीवरून तोंडाला मास्क असलेला व काळा चश्मा घातलेले दोघे त्या व्यापाऱ्याजवळ आले. अधिकारी असल्याचे भासवून बँगेत काय आहे, असे विचारून बँग उघडून त्यातील २ लाख रुपये लंपास केले. सिनेमात शोभेल असे स्टाईलने चोरी झाली. दुचाकीवरून धूम ठोकत मुख्य रस्त्याने चोरटे पळाले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. गावातील दुकानदारांच्या सीसीटीव्ही कॅमेरेत आरोपी कैद झाल्याने त्या फुटेजवरून पोलिसांना त्या चाेरट्याचा सुगावा लागला असून, त्या दिशेने कुरुंदा पोलीस व गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक तपास करीत आहेत. या चोरट्यांनी आगोदर वसमत शहरात सराफा दुकानात चोरी केली. त्यानंतर, काही तासाने कुरुंद्यात चोरी केली. हे चोरटे गावात फिरल्याची चर्चा असून, नजर ठेवून चोरी केल्याची चर्चा आहे. दिवसाढवळ्या झालेल्या चोरीच्या घटनेनंतर कुरुंदा पोलिसांनी व्यापाऱ्यांची बैठक बोलावली. या बैठकीला प्रभारी डीवायएसपी शेख हाश्मी, सपोनि सुनील गोपीनवार, फाैजदार सविता बोधनकर, व्यापारी, प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार, ग्रामस्थ उपस्थित होते. नागरिकांनी सतर्कता बाळगावी, पोलिसांची गस्त वाढविण्यात येणार असून, चोरट्यांचा शोध घेण्यासाठी त्या दृष्टिकोनातून तपास करण्यात येत असल्याचे डीवायएसपी शेख हाश्मी यांनी सांगितले.