पहिली ते चौथीची मुले घरात कंटाळली, त्यांना हवी शाळा, पालकांचाही होकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:27 IST2021-02-14T04:27:50+5:302021-02-14T04:27:50+5:30

कोरोनामुळे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये मागील आठ ते दहा महिन्यांपासून बंद ठेवण्यात आली होती. कोरोना रुग्णसंख्या कमी होत गेल्याने सुरुवातीला ...

Children from 1st to 4th are bored at home, they want school, yes parents too | पहिली ते चौथीची मुले घरात कंटाळली, त्यांना हवी शाळा, पालकांचाही होकार

पहिली ते चौथीची मुले घरात कंटाळली, त्यांना हवी शाळा, पालकांचाही होकार

कोरोनामुळे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये मागील आठ ते दहा महिन्यांपासून बंद ठेवण्यात आली होती. कोरोना रुग्णसंख्या कमी होत गेल्याने सुरुवातीला नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थी, पालकांचा प्रतिसाद बघता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. कोरोनाच्या नियमांचे पालन करीत शाळा सुरू झाल्याने शाळांत किलबिलाट सुरू झाला आहे. मात्र, अद्याप पहिली ते चौथीचे वर्ग सुरू झाले नाहीत. शहरातील शाळांतून ऑनलाइन शिक्षण सुरू असले तरी ग्रामीण भागात मोबाइल रेंजचा प्रश्न कायम आहे. अनेक पालकांकडे तर ॲण्ड्राइड मोबाइल नसल्याने मोठी पंचाईत होत आहे. दिवसभर अभ्यास नसल्याने मुलेही घरात राहून कंटाळली आहेत. शाळा सुरू झाल्यास मुले शाळेत जाण्यास तयार असून पालकही मुलांना शाळेत पाठविण्यास तयार असल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे.

मला यावर्षी पहिल्यांदाच पहिलीच्या वर्गात गेले आहे. मात्र, शाळाच बंद असल्याने घरीच आहे. घरी राहून आता कंटाळा येत आहे. शाळेसाठी नवीन शूज, स्कूल बॅग, घरातच असून घालताही येत नाही. मला शाळेत जायचे आहे.

-श्रावणी स्वामी, इयत्ता पहिली

यावर्षी आमची शाळा सुरू झालीच नाही. घरीच अभ्यास करून कंटाळा येत असून आई व पप्पा बाहेर फिरू देत नाहीत. शाळेची खूप आठवण येत असून माझे नवीन दप्तर व शाळेचा गणवेश तसाच ठेवून दिला आहे. मला शाळेत जावे वाटत आहे.

-अश्विनी खराटे, इयत्ता दुसरी

घरी राहून खूप कंटाळा आला असून शाळेत जावे वाटत आहे. परंतु, आमचे शिक्षक फक्त पाचवीपासून पुढच्यांनाच शाळेत येऊ देत आहेत. आमचे वर्ग अजूनही बंदच आहेत. यावर्षी ध्वजारोहणलाही जाता आले नाही. आम्हाला लवकर शाळेत जायचे आहे

- अमृता मुलगीर, इयत्ता तिसरी

घरात सारखं-सारखं राहून कंटाळा आला आहे. सर्वच मुले शाळेत जात आहेत. आम्ही मात्र घरीच राहत असून आम्हालाही शाळेत जायचं आहे. वर्ग लवकर सुरू करावेत.

-तन्वी गव्हाणे, इयत्ता पहिली

पालकांना चिंता...

मागील जवळपास एक वर्षापासून कोरोनामुळे शाळा बंद आहेत. परिणामी, विद्यार्थी घरातच असून अभ्यासाची सवय तुटली आहे. माझी मुलगी इयत्ता चौथ्या वर्गात शिकत आहे. पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग बंदच असल्याने पालकांसह विद्यार्थीही सुट्ट्यांना कंटाळले आहेत. वर्ग सुरू नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

- अरविंद खराटे, पालक

इतर वर्गांची शाळा सुरू झाली तरी चौथीपर्यंतचे विद्यार्थी अद्याप घरीच आहेत. शाळा नसल्यामुळे अभ्यास होत नसून वर्ष वाया जात आहे. इतर वर्गाप्रमाणे प्राथमिकचे वर्गही सुरू करावेत, अशी अपेक्षा आहे.

-ज्ञानेश्वर गोफणे, पालक

यावर्षी शाळाच सुरू न झाल्याने वर्षभरापासून विद्यार्थी घरीच आहेत. ऑनलाइन अभ्यासक्रम सद्य:स्थितीत सुरू नसल्याने व ग्रामीण भागात आम्हा पालकांना मुलांकडे सतत लक्ष देता येत नसल्याने मुलांमध्ये उनाडक्या वाढत आहेत. त्यामुळे शाळा सुरू होणे गरजेचे आहे.

-सिद्धार्थ मोरे, पालक

कोरोनामुळे काही नियम व अटी घालून पाचवी ते बारावीपर्यंचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळत आहे. आता पहिली ते चौथीचे वर्गही सुरू करावेत. मुले घरात राहून कंटाळले आहेत.

-सचिन बेलोकर, पालक जिल्ह्यातील पहिली ते चौथीच्या शाळा

१३१५

विद्यार्थीसंख्या

९००२३

Web Title: Children from 1st to 4th are bored at home, they want school, yes parents too