खासगी रुग्णवाहिकेला भाडे देणे परवडेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:28 IST2021-04-18T04:28:51+5:302021-04-18T04:28:51+5:30

हिंगोली : जिल्ह्यात शासकीय रुग्णवाहिका १२ असून खासगी रुग्णवाहिका ९ आहेत. परंतु, खासगी रुग्णवाहिकेचे भाडे रुग्णांच्या नातेवाइकांना परवडेना झाले ...

Can't afford to rent a private ambulance | खासगी रुग्णवाहिकेला भाडे देणे परवडेना

खासगी रुग्णवाहिकेला भाडे देणे परवडेना

हिंगोली : जिल्ह्यात शासकीय रुग्णवाहिका १२ असून खासगी रुग्णवाहिका ९ आहेत. परंतु, खासगी रुग्णवाहिकेचे भाडे रुग्णांच्या नातेवाइकांना परवडेना झाले आहे. अव्वाच्या सव्वा भाडे घेतले जात असल्याचे नातेवाइकांचे म्हणणे आहे.

मागील दोन महिन्यांपासून कोरोनाने कहर माजविला आहे. या काळात तरी खासगी रुग्णवाहिकेने दर कमी करणे गरजेचे असताना गाडी परवडत नाही, असे सांगून अव्वाच्या सव्वा भाडे घेतले जात असल्याचे रुग्णांच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे. शासकीय रुग्णवाहिकेत ऑक्सिजनची व्यवस्था असून ऑक्सिजनही आहे. परंतु, खासगी रुग्णवाहिकेत नुसती ऑक्सिजनची व्यवस्था आहे, परंतु, ऑक्सिजन मात्र पाहायला मिळत नाही. पाच-सहा दिवसांपासून ऑक्सिजनचा तुटवडा असल्याचे खासगी रुग्णवाहिका चालकांनी सांगितले.

जिल्ह्याबाहेर ४ हजार

एखादा साधा रुग्ण जिल्ह्याच्या बाहेर न्यायचा असेल तर २ हजार ५०० रुपये घेतो. परंतु, कोरोना रुग्ण असेल तर ४ हजार रुपये घेतो. कारण सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दरही वाढले आहेत.

शहरात ७०० रुपये

शहरातल्या शहरात साधा रुग्ण न्यायचा असेल तर ७०० रुपये घेतो तर कोरोना रुग्ण असेल तर १२०० रुपये घेतो. ऑक्सिजनचा तुटवडा असल्यामुळे सध्या ऑक्सिजनच्या टाक्या खालीच आहेत.

तक्रार कुठे करायची?

शहरातील रुग्णवाहिकेबाबत तक्रार असल्यास जिल्हा शल्यचिकित्सकांकडे करावी तर ग्रामीण भागातील रुग्णवाहिकेबाबत तक्रार असल्यास जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना बोलावे, असे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले.

१०८ नंबर सर्वांसाठी खुला

रुग्णवाहिकेच्या संदर्भात काही तक्रार असल्यास रुग्णांच्या नातेवाइकांनी १०८ नंबरवर कॉल करून तक्रार दिल्यास त्याची रीतसरपणे नोंद घेतली जाते.

जिल्ह्यात १२ रुग्णवाहिका आहेत. सर्वच रुग्णवाहिकेमध्ये ऑक्सिजनची सुविधा आहे. एवढेच काय सर्वच रुग्णवाहिकेमध्ये डॉक्टर व मेडिसीन पण उपलब्ध करून दिलेले आहे. ज्यामुळे रुग्णाला कोणताही त्रास होत नाही.

- डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक

Web Title: Can't afford to rent a private ambulance