मंडळ अधिकाऱ्यांनी पकडले दोन वाळूचे टिप्पर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:21 IST2020-12-27T04:21:52+5:302020-12-27T04:21:52+5:30
वसमत : तालुक्यातील बोरी पाटीजवळ शुक्रवारी रात्री मंडळ अधिकारी, तलाठी यांच्या पथकाने नदी घाटावरून वाळू घेऊन येणारे दोन टिप्पर ...

मंडळ अधिकाऱ्यांनी पकडले दोन वाळूचे टिप्पर
वसमत : तालुक्यातील बोरी पाटीजवळ शुक्रवारी रात्री मंडळ अधिकारी, तलाठी यांच्या पथकाने नदी घाटावरून वाळू घेऊन येणारे दोन टिप्पर पकडले. दोन कर्मचाऱ्यांनी दोन टिप्पर पकडण्याची धाडसी कारवाई केली. त्यातील एक पळून गेले असून दुसरे ताब्यात घेतले असल्याची माहिती मंडळ अधिकारी डी. एस. खोकले यांनी दिली.
वसमत तालुक्यातील नदी घाटावर वाळू उपसा करून चोरुन नेणाऱ्या वाहनांनी कहर केला आहे. तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी कारवाई केली, तरी वाळू उपसा बंद होत नाही. सध्या तहसीलदार रजेवर असल्याने परळी, सावंगी सोन्ना, माटेगाव, ढवुळगाव नदी घाटांवर वाळू चोरट्यांची गर्दी आहे. तसेच वसमत शहरात हायवा, टीप्पर वाळू टाकून जात आहेत. महसूल आणि पोलीस प्रशासनाची त्यांना भीती राहिली नाही. ग्रामपंचायत निवडणूक कामात महसूल कर्मचारी व्यस्त असल्याने वाळू उपसा करणाऱ्या वाहनांचे फावत आहे.
शुक्रवारी मंडळ अधिकारी डी. एस. खोकले, तलाठी भुसावळे यांनी बोरी पाटीजवळ दोन टिप्पर वाळू घेऊन वसमतकडे जाताना आढळले. त्यांनी दोन्ही टिप्परची चौकशी केली. विनापरवाना वाहतूक करण्यात येत असल्याने दोन्ही वाहनांना ताब्यात घेण्याची तयारी सुरू असताना एकाने गुंगारा देऊन पसार झाला. दुसरे वाहन क्र एमएच. ०४ एफयू ३५४५ ताब्यात घेतले आहे.
या संदर्भात मंडळ अधिकारी खोकले यांच्याशी संपर्क साधला असता, एक वाहन ताब्यात घेतले आहे. कोण्या तरी सरपंचाचे हे वाहन असल्याचे चालक सांगत आहे. दुसरे पळून गेलेले ते वाहन परळी येथील आहे. त्याचा शोध घेत गुन्हा नोंदविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.