जवळा बाजार येथे महाविकास आघाडीला भाजपची साथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:29 IST2020-12-29T04:29:08+5:302020-12-29T04:29:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क औंढा नागनाथ : तालुक्यातील १०१ ग्रामपंचायतींपैकी ८८ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीमध्ये ...

जवळा बाजार येथे महाविकास आघाडीला भाजपची साथ
लोकमत न्यूज नेटवर्क
औंढा नागनाथ : तालुक्यातील १०१ ग्रामपंचायतींपैकी ८८ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीमध्ये तालुक्यातील सर्वात मोठी जवळा बाजार ग्रामपंचायत असून, सर्वात लहान ग्रामपंचायत येळी आहे. याठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध सेना - भाजप असे चित्र होणार असल्याचे दिसून येत आहे. तसेच जवळा बाजार ग्रामपंचायत लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले असून, मातब्बरांना शह देण्यासाठी शिवसेना - भाजप - राष्ट्रवादी एकत्र आल्याचे चित्र आहे.
औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार ही सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. याठिकाणी ६ प्रभागात एकूण १७ सदस्य आहेत. या निवडणुकीत सत्तेसाठी मोठी चुरस निर्माण हाेणार असल्याचे चित्र आहे. ही ग्रामपंचायत यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल यांच्याकडे हाेती. मात्र, विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा दिला. त्यामुळे सध्या तरी याठिकाणी यांचे स्वतंत्र पॅनेल असणार आहे. त्यांना लढत देण्यासाठी येथील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काॅंग्रेस एकत्र येऊन पॅनेल करण्याच्या तयारीत आहेत. जवळा बाजारमध्ये महाविकास आघाडीत भाजप मदतीला येत आहे. त्यामुळे याठिकाणी तीन प्रमुख पक्षांच्या आघाडी विरुद्ध पटेल यांच्यात लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या चुरशीच्या लढतीत कोण बाजी मारणार, याकडे लक्ष लागले आहे.
तालुक्यातील सर्वात लहान ग्रामपंचायत असलेल्या येळी येथे ७ सदस्य आहेत. यापूर्वी येथे शिवसेना - भाजपचे सरपंच होते. परंतु या वेळेस येथे राष्ट्रवादी स्वतंत्र पॅनेल करून निवडणूक लढवत सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. दोन गटात निवडणूक हाेणार असल्याने चुरस वाढली आहे.
औंढा तालुक्यात १,१०,०५९ एवढी मतदार संख्या आहे. यामध्ये ५७ हजार १५२ पुरुष मतदार, तर ५२ हजार ९०७ महिला मतदार आहेत. तालुक्यात एकूण ७०४ सदस्य जनतेमधून निवडून दिले जाणार आहेत. औंढा तालुक्यातील बहुतांश ठिकाणी सरळ लढत होणार असल्याचे चित्र आहे. तसेच वीस ते पंचवीस ग्रामपंचायती बिनविरोध होणार असून, याकडे प्रशासन लक्ष ठेवून आहे.
जवळा बाजार येथील एकूण मतदार संख्या १०,४२२ इतकी आहे. यामध्ये पुरुष ५ हजार २६५, तर महिला ४ हजार ९७६ आहेत. येळी ग्रामपंचायतीची एकूण मतदार संख्या ६२९ असून, यामध्ये पुरुष ३१९, तर महिला मतदारांची संख्या ३१० एवढी आहे.