तुरीच्या उत्पादनात मोठी घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:18 IST2021-01-13T05:18:27+5:302021-01-13T05:18:27+5:30
करंजी : यावर्षी पाऊस चांगला झाल्याने शेतकऱ्यांनी तुरीची पेरणी केली. परंतु काढणीच्या अगोदर व काढणीच्या वेळी वातावरणाचा फटका बसल्याने ...

तुरीच्या उत्पादनात मोठी घट
करंजी : यावर्षी पाऊस चांगला झाल्याने शेतकऱ्यांनी तुरीची पेरणी केली. परंतु काढणीच्या अगोदर व काढणीच्या वेळी वातावरणाचा फटका बसल्याने उत्पादनात घट झाली आहे.
गतवर्षीपेक्षा यावर्षी पाऊस चांगला झाला. यामुळे कापूस, सोयाबीन, मूग आदी पिकांबरोबर शेतकऱ्यांनी तुरीचेही पीक घेतले. अतिवृष्टीने खरीपातील कापूस, सोयाबीन, मूग, उडीद आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. दरवर्षी कोणत्या ना कोणत्या संकटाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. गतवर्षीप्रमाणे याहीवर्षी अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे नुकसान केले. खरीपातील तूर हे पीक तरी साथ देईल, असे वाटले होते. परंतु, वातावरणामुळे तुरीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे शेतकरी परत संकटात सापडला आहे. काढणीच्या अगोदर तुरीवर अळीचा प्रादुर्भाव झाला होता. विविध औषधांची फवारणी करूनही काही उपयोग झाला नाही, असे शेतकऱ्यांच्या म्हणणे आहे. परिसरातील दारेफळ, करंजी, गुंडा, विरेगाव, संगनापूर, कुडाळा, टेंभुर्णी आदी गावात तुरीचे पीक घेतले होते. सध्या तुरीची काढणी व कापणी सुरु आहे. पण, यावर्षी उत्पन्न कमी होत असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. तुरीचे उत्पादन चांगले झाले असते, तर रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकांसाठी औषधी खरेदी करण्यासाठी पैसा हातात आला असता. परंतु, वातावरणामुळे तूर पीकही वाया गेले आहे. शासनाने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना अनुदान द्यावे, अशी मागणी एकनाथ मलांडे, तुळशीराम मलांडे, सचिन आव्हाड, बाळू इंगोले, माणिकराव भालेराव, गणेश वालेकर आदी शेतकऱ्यांनी केली आहे.