कवडीमोल दरात विकले पूर्णा साखर कारखान्याचे बाराशिव युनिट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 04:18 PM2020-08-26T16:18:08+5:302020-08-26T16:22:07+5:30

सभासद व बहुतांश संचालकांनाही अंधारात ठेवून चेअरमन व सत्ताधारी संचालक मंडळाने कारखाना आपल्या निकटवर्तीयांना अल्पदरात विकल्याचा आरोप

Barashiv unit of Purna Sugar Factory sold at a cheap price | कवडीमोल दरात विकले पूर्णा साखर कारखान्याचे बाराशिव युनिट 

कवडीमोल दरात विकले पूर्णा साखर कारखान्याचे बाराशिव युनिट 

Next
ठळक मुद्देमाजी जि. प. सदस्यांचा आरोप  फेरनिविदा काढण्याची मागणी

हिंगोली : पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे युनिट २ असलेला बाराशिव कारखाना हा साखर संघाचे अध्यक्ष असलेल्या जयप्रकाश दांडेगावकर यांच्या ताब्यात असूनही त्याची विक्री करण्याची वेळ आली.  तो त्यांच्याच निकटवर्तीयांना कवडीमोल दरात विकल्याचा आरोप करून फेरनिविदा काढण्याची मागणी शिवसेनेचे माजी जि.प.सदस्य प्रल्हाद इंगोले यांनी प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे केली आहे. दांडेगावकरांनी मात्र अजूनही जास्तीचे दर देणाऱ्याला कारखाना देण्याची तयारी दर्शवीत आरोप फेटाळले.

याबाबत तक्रारदार इंगोले म्हणाले, ‘‘सभासद व बहुतांश संचालकांनाही अंधारात ठेवून चेअरमन व सत्ताधारी संचालक मंडळाने कारखाना आपल्या निकटवर्तीयांना अल्पदरात विकला. त्यामुळे संस्थेचे पर्यायाने शेतकरी सभासदांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. एकंदरीत कारखाना विक्रीची पूर्ण प्रक्रिया ही बेकायदेशीर झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील भाऊराव चव्हाण साखर कारखान्याने केवळ साडेबाराशे मेट्रिक टन क्षमता असणारा हुतात्मा जयवंतराव हदगाव हा कारखाना ९१ कोटीस तर शंकर वाघलवाडा ५२ कोटी रुपयास विकून संस्थेचे हित पाहिले, परंतु पूर्णा युनिट २ बाराशिव हा अडीच हजार मेट्रिक टन क्षमता असणाऱ्या कारखान्याचे मूल्यांकनच केवळ ३८ कोटी रुपये करून तो नाममात्र ३८.३ कोटी रुपयांना विकला. याच्या चौकशीची मागणी मुख्यमंत्री, सहकारमंत्री, नांदेडच्या विभागीय साखर सहसंचालक कार्यालयात केली.’’ याबाबत नांदेडचे साखर सहसंचालक कार्यालयातील अधीक्षक ए. यू. वाडीकर यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘पूर्णा कारखान्याकडून बाराशिव युनिट विक्री केल्याची मान्यता देण्यासाठी शासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र, त्याला शासनाकडून अजून मान्यता मिळालेली नाही.’’ 


चांगला दर मिळाल्यास स्वागतच -दांडेगावकर
याबाबत पूर्णाचे चेअरमन जयप्रकाश दांडेगावकर म्हणाले, सततचा दुष्काळ व वाढती देणी लक्षात घेता पूर्णाचे मुख्य युनिटच अडचणीत येण्याची भीती निर्माण झाल्याने २0१७ साली ठराव घेऊन बाराशिव युनिट विक्रीचा निर्णय झाला. त्यासाठी तीन मोठ्या वर्तमानपत्रांत तीनदा जाहिरात देऊनही प्रतिसाद नव्हता. चौथ्या वेळी प्रतिसाद आला. आमच्या कारखान्याचे मूल्यांकन ३३ कोटी रुपये झाले होते व ३८.३ कोटींची सर्वाधिक निविदा होती. तीही संचालक मंडळाला मान्य नव्हती. त्यानंतर पुन्हा संचालक मंडळाच्या म्हणण्यावरून ओपन बीड ठेवली. त्यातही दोघांनी सहभाग घेतला. पुन्हा ३८.३ कोटींचाच दर मिळाला. ११ लाख अनामत व २५ टक्के रक्कम जमा करून अ‍ॅग्रिमेंट टू सेल झाले.  कोणी आताच्या पेक्षा घसघशीत चांगला दर देत असेल तर आम्ही सध्याच्या खरेदीदाराला व्याजासह रक्कम परत करून इतरालाही कारखाना विक्री करायला तयार आहोत. शेवटी संस्थेचे हित पाहणेच आमचे काम आहे.

Web Title: Barashiv unit of Purna Sugar Factory sold at a cheap price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.