बसस्थानकातील शौचालयाची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:18 IST2021-01-13T05:18:18+5:302021-01-13T05:18:18+5:30
प्रचारफेऱ्यांनी ग्रामीण भागात वातावरण तापले हिंगोली : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार जोर धरू लागला आहे. जिल्ह्यातील गावागावांमध्ये भेटीगाठीवर भर ...

बसस्थानकातील शौचालयाची दुरवस्था
प्रचारफेऱ्यांनी ग्रामीण भागात वातावरण तापले
हिंगोली : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार जोर धरू लागला आहे. जिल्ह्यातील गावागावांमध्ये भेटीगाठीवर भर दिला जात आहे. त्याचबरोबर सोशल मीडियाचाही वापर केला जात आहे. एकंदर ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामीण भागात वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे.
ढगाळ वातावरणामुळे पिकांवर परिणाम
हिंगोली : जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे रब्बी पिकांवर त्याचा परिणाम होताना दिसून येत आहे. हरभरा पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. पिकावर पडत असलेल्या रोगाबाबत कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.
जड वाहनामुळे शहरात वाहतुकीची कोंडी
हिंगोली : शहरातील गांधी चौक, महावीर चौक आदी भागामध्ये जड वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. या बाबीची शहर वाहतूक शाखेने दखल घेऊन जड वाहनांवर कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
नाल्यांवर औषध फवारणी करण्याची मागणी
कळमनुरी : मागील काही दिवसांपासून शहरातील मुख्य रस्त्यावरील नाल्या साफ केलेल्या नाहीत. त्यामुळे नाल्यातील पाणी रस्त्यावर येत आहे. घाण पाण्यामुळे डासांचे प्रमाणही वाढले आहे. वाहनचालकांना घाण पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाने याची वेळीच दखल घेऊन घाण पाण्याची विल्हेवाट लावून नाल्यांवर औषध फवारणी करावी, अशी मागणी होत आहे.
वीजपुरवठा खंडित; शेतकरी त्रस्त
आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर व परिसरात मागील काही दिवसांपासून विजेचा लपंडाव नित्याचाच झाला आहे. विहिरींना पाणी असूनही वीज खंडित होत असल्यामुळे पिकांना देता येत नाही. त्यामुळे पिके सुकून जात आहेत. महावितरण कंपनीने ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
शहरात गतिरोधकाची मागणी
हिंगोली : रेल्वे उड्डाण पूल ते बसस्थानकापर्यंत वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जड वाहनांचीही या रस्त्यावरून वर्दळ असते. काही वाहनचालक वाहने वेगाने चालवित आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. संबंधित विभागाने याची दखल घेऊन या वर्दळीच्या रस्त्यावर गतिरोधक बसवावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
रस्त्याचे काम अर्धवट
हिंगोली : शहरातील नांदेड नाका ते उड्डाण पुलापर्यंतचा रस्ता दगडी चुरी टाकून अर्धवट ठेवण्यात आला आहे. या दगडी चुरीमुळे वाहने चालविणे वाहनचालकांना कठीण झाले आहे. संबंधित विभागाने याची दखल घेऊन दगडी चुरीवर डांबर टाकून चांगल्या पद्धतीने रस्ता तयार करावा, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.