हिंगोलीच्या मोंढ्यात सोयाबीनच्या २०० पोत्यांची आवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:35 IST2021-09-17T04:35:44+5:302021-09-17T04:35:44+5:30
गतवर्षी सोयाबीनला चांगला दर मिळाला होता. त्यामुळे यावर्षी सोयाबीनचा पेरा वाढला आहे. सध्या पाऊस सुरू असला, तरी अनेक शेतकऱ्यांचे ...

हिंगोलीच्या मोंढ्यात सोयाबीनच्या २०० पोत्यांची आवक
गतवर्षी सोयाबीनला चांगला दर मिळाला होता. त्यामुळे यावर्षी सोयाबीनचा पेरा वाढला आहे. सध्या पाऊस सुरू असला, तरी अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन काढणीस आले आहे. काही शेतकऱ्यांनी नवीन सोयाबीन बाजारपेठेत विक्रीसाठी आणण्यास सुरुवात केली आहे. हिंगोली येथील जुन्या मोंढ्यात ९ सप्टेंबरपासून नवीन सोयाबीन खरेदीला सुरूवात झाली आहे. पहिल्याच दिवशी सोयाबीनने उच्चांक गाठत ११ हजारांचा टप्पा पार केला होता. मात्र, जसजसे सोयाबीन मोंढ्यात येण्यास सुरुवात झाली, तसतशी भावात घसरण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. दि. १६ सप्टेंबर रोजी मोंढ्यात २०० पाेत्यांची आवक झाली होती, मात्र यावेळी दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. गुरूवारी सोयाबीनला प्रतिक्विंटल ८ हजार ५०० रूपये दर मिळाला. यावर्षी सोयाबीनच्या काही वाणांना शेंगा लागल्या नसल्याच्या तक्रारी होत असल्या, तरी सध्या चांगल्या प्रतीचे सोयाबीन बाजारपेठेत येत आहे. त्यामुळे चांगला दर मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.