कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने वाढविली चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:55 IST2021-02-21T04:55:38+5:302021-02-21T04:55:38+5:30
हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. एका आकड्यावर आलेली संख्या दोन आकड्यांवर पोहोचत आहे. २० फेब्रुवारी ...

कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने वाढविली चिंता
हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. एका आकड्यावर आलेली संख्या दोन आकड्यांवर पोहोचत आहे. २० फेब्रुवारी रोजी तब्बल १९ रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.
मागील आठवड्यापासून रुग्णसंख्या वाढतच आहे. शनिवारी जिल्ह्यात तब्बल २७ रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये हिंगोली, वसमत, कळमनुरी, सेनगाव परिसरात २६ जणांची रॅपिड अँटिजन टेस्ट घेण्यात आली होती. यामध्ये एकही रुग्ण आढळला नसला तरी आरटीपीसीआर टेस्टमध्ये तब्बल २७ रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये हिंगोली परिसरात २०, सेनगाव ३ तर कळमनुरी परिसरात ४ रुग्णांचा समावेश आहे. रुग्णसंख्या वाढली असली तरी शनिवारी तब्बल ११ रुग्ण बरे झाले आहेत. यात जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ९ तर औंढा येथील कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या २ रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आतापर्यंत कोरोनाचे ३ हजार ८९१ रुग्ण आढळले असून, त्यापैकी ३ हजार ७४० रुग्ण बरे झाले आहेत. तसेच एकूण ५८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजघडीला ९३ रुग्णांवर उपचार सुरू असून, जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ६ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे.
प्रशासनाची उदासीनता की नागरिकांची निष्काळजी
जिल्हा प्रशासनाने ठोस उपाययोजना केल्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली होती. रुग्णसंख्या घटल्याने आता कुठे सर्व व्यवहार सुरळीत झाले होते. त्यामुळे कोरोना जिल्ह्यातून हद्दपार झाल्याच्या आविर्भावात नागरिक राहत आहेत. बाजारपेठेत नागरिकांची गर्दी कायम राहत असून, तोंडाला मास्क न वापरणे, शारीरिक अंतर न ठेवणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत आहे. तसेच कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर प्रशासनही ठोस कारवाई करीत नसल्याने कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याचे चित्र जिल्हाभरात पाहावयास मिळत आहे.