हिंगोली : येथील काँग्रेसचे माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर समर्थकांची बैठक रविवारी पार पडली असून, शिंदेसेनेमध्ये प्रवेश करण्याबाबत कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यात आली. त्यामुळे येत्या काही दिवसांत भाऊ पाटील शिंदेसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.
विधानसभेच्या निवडणुकीत हिंगोली विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर हे काँग्रेसकडून तिकीट मिळविण्यासाठी इच्छुक होते. मात्र, काँग्रेसने आपल्या वाट्याची जागा शिवसेना उबाठा गटाला सोडली. त्यामुळे माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर यांनी बंडखोरी करीत अपक्ष निवडणूक लढविली होती. येत्या काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे. याच अनुषंगाने भाऊ पाटील गोरेगावकर यांनी समर्थक कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत शिवसेना शिंदेसेनेत प्रवेश करण्याविषयी चाचपणी करण्यात आली. त्यामुळे काँग्रेसचे माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर हे शिंदेसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चा होत आहेत.
कार्यकर्ते आग्रही आहेतरविवारी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने आपल्याला उमेदवारी दिली नाही, याबद्दल कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. आता जिल्हा परिषदेची निवडणूक लढवायची आहे. आम्ही तुमच्या सोबतच आहोत, असे कार्यकर्त्यांनी भाषणात सांगितले. शिंदेसेनेत प्रवेशाबाबत कार्यकर्ते आग्रही आहेत. कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार लवकरच निर्णय घेऊ.