भारत फायनान्सच्या कर्मचाऱ्यानेच टिप देऊन लुटायला लावली रक्कम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:35 IST2021-09-08T04:35:37+5:302021-09-08T04:35:37+5:30
हिंगोली : मार्च महिन्यात वसमत तालुक्यातील कौठा पाटी परिसरात चाकूचा धाक दाखवून लुटलेली भारत फायनान्स कंपनीची १ लाख ६० ...

भारत फायनान्सच्या कर्मचाऱ्यानेच टिप देऊन लुटायला लावली रक्कम
हिंगोली : मार्च महिन्यात वसमत तालुक्यातील कौठा पाटी परिसरात चाकूचा धाक दाखवून लुटलेली भारत फायनान्स कंपनीची १ लाख ६० हजारांची रक्कम हस्तगत करण्यात वसमत शहर पोलिसांना यश आले. या कंपनीच्याच एका कर्मचाऱ्याने टिप देऊन हा प्रकार केला आहे. जिंतूर तालुक्यातील एका प्रकरणात त्याने स्वत:च फिर्याद देऊन असा बनाव केल्याचेही समोर आले आहे.
वसमत शहर ठाण्याच्या हद्दीत कौठा पाटीजवळ ३१ मार्च २०२१ रोजी अभिलाष राजारेडी येनगोड हा भारत फायनान्सचा फिल्ड ऑफिसर कंपनीची १ लाख ६० हजारांची रक्कम घेऊन जात होता. तेव्हा मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी अडवून त्यांच्याकडील १ लाख ६० हजारांची रक्कम चोरून नेली होती. या प्रकरणाचे सायबर सेलच्या मदतीने तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर अशाच प्रकारचा गुन्हा याच कंपनीच्या कर्मचाऱ्याबाबत घडल्याचे समोर आले. अधिक चौकशी केल्यावर भारत फायनान्सच्या एका कर्मचाऱ्यानेच टिप देऊन हा प्रकार घडवून आणल्याचे समोर आले. यात नांदेड जिल्ह्यात कंधार तालुक्यातील मानसपुरीचा विश्वजित आनंदा शिनगारपुतळे हा मिस्त्ती.................... मुख्य सूत्रधार आहे. त्याने खासगी नोकरी करणाऱ्या ओमकार ऊर्फ पमा रामराव फुले याच्या मदतीने कौठा पाटी येथे ही रक्कम लुटली होती. या दोघांना ताब्यात घेऊन विचारपूस केल्यानंतर भारत फायनान्सचाच एक फिल्ड ऑफिसर आकाश रमेश जोंधळे याने टिप दिल्याने ही लूट केल्याचे आरोपींनी कबूल केले. या आरोपींकडून रक्कम, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण २.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी पत्रकार परिषदेत तपासाची माहिती दिली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, फौजदार शिवसांब घेवारे, अभय माकणे, भाग्यश्री कांबळे, कर्मचारी किशोर कातकडे, विठ्ठल काळे, ज्ञानेश्वर पायघन, शेख जावेद, जयप्रकाश झाडे, दीपक पाटील यांची उपस्थिती होती.
जिंतूरमध्ये आकाशलाच लुटले
वरील प्रकारची घटना जिंतूर पोलीस ठाणे हद्दीतही घडली होती. यात आकाश जोंधळेच फिर्यादी आहे. तर त्याला लुटणारे इतर कोणी दुसरे नव्हते तर या घटनेतील दोन आरोपीच आहेत. तेथील डाव साधल्याने धाडस वाढल्याने त्यांनी हा नवा प्रकार केला.
शंभर टक्के रक्कम वसूल
सहसा चोरीतील १०० टक्के रक्कम वसूल होत नाही. आरोपी खर्चून टाकतात. अथवा तपास अधिकारी त्यावर फार फोकस करीत नाहीत. मात्र यातील १ लाख ६० हजार पूर्णपणे जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आल्याचे दिसत आहे.