हिंगोली : तालुक्यातील बोराळा येथे साठवण तलावाचे काम सुरू असून, हे काम दर्जाहीन होत असल्याचा आरोप करीत शेतकरी, ग्रामस्थांनी या कामास विरोध दर्शविला आहे. १० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास शेतकऱ्यांनी तलाव परिसरात येत काम बंद केले. जोपर्यंत कामाची चौकशी होत नाही, तोपर्यंत काम सुरू करू देणार नसल्याचा आक्रमक पवित्रा घेतला आहे.
बोराळा, बोराळवाडी शिवारातील जवळपास ५१ हेक्टर जमिनीवर साठवण तलाव होत आहे. या तलावाचे काम गतवर्षी सुरू करण्यात आले, तर पावसाळ्यात काही महिने काम बंद होते. आता पुन्हा काम हाती घेण्यात आले असून, तलावाच्या भिंतीत काळी माती, मुरुमाची दबाई व्यवस्थित करण्यात आली नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शिवाय सांडवाची भिंत आणि तलावाच्या डाव्या बाजूला उभारण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीटच्या भिंतीला तडे गेले आहेत. ही बाब संबंधित यंत्रणेच्या लक्षात आणून देण्यात आली. परंतु, कामाचा दर्जा सुधारण्यात आला नसल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले.
१० फेब्रुवारी रोजी गावातील शेतकरी, ग्रामस्थांनी तलाव परिसरात येत रोष व्यक्त केला. यादरम्यान संबंधितांना काम बंद करण्याची विनंती शेतकऱ्यांनी केली. यादरम्यान जोपर्यंत कामाची चौकशी होत नाही, कामाचा दर्जा सुधारला जात नाही, तोपर्यंत काम सुरू करू देणार नसल्याचा पावित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.
यंत्रणेचे दुर्लक्ष; शेतकऱ्यांत रोष...साठवण तलावात बोराळा आणि बोराळवाडी येथील शेकडो शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. परंतु, परिसराचा पाणीप्रश्न मिटेल, टंचाई दूर होईल, या हेतूने शेतकऱ्यांनी तलावाला विरोध केला नाही. परंतु, आता काम दर्जाहीन होत असल्यामुळे रोष व्यक्त होऊ लागला आहे. हा तलाव गावापासून अर्धा कि.मी. अंतरावर आहे. शिवाय तलावाची भिंत गावाच्या बाजूने असल्याने काम दर्जेदार होणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात गावाला धोका निर्माण होऊ शकतो. याकडे मात्र जलसंपदा विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.