तूर विक्रीनंतर शेतकऱ्यांकडील ६२ हजार रुपये पळवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:56 IST2021-02-05T07:56:20+5:302021-02-05T07:56:20+5:30
कुरुंदा : वसमत तालुक्यातील बोखारे पांगरा येथील दोन शेतकरी तूर विकण्यासाठी शिरडशहापूर येथे गेले होते. तुरीची विक्री करून आलेले ...

तूर विक्रीनंतर शेतकऱ्यांकडील ६२ हजार रुपये पळवले
कुरुंदा : वसमत तालुक्यातील बोखारे पांगरा येथील दोन शेतकरी तूर विकण्यासाठी शिरडशहापूर येथे गेले होते. तुरीची विक्री करून आलेले पैसे या शेतकऱ्यांनी खिशात ठेवले. दरम्यान, या दोन्ही शेतकऱ्यांच्या खिशातील एकूण ६२ हजारांची रक्कम चोरट्यांनी पळविल्याची घटना २३ जानेवारी रोजी घडली.
शिरडशहापूर येथे जैन ट्रेडिंग कंपनीच्या व्यापाऱ्याकडे पांगारा बोखारे येथील शेतकरी विठ्ठल बोखारे, किशन शिंदे यांनी तूर विकल्यानंतर आलेले पैसे पॅंटच्या खिशात ठेवले. या शेतकऱ्यांच्या खिशातील एकूण ६२ हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले. ही चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असल्याने चोरट्यांचे चेहरेही कैद झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. गेल्या महिन्यात कुरुंदा येथे व्यापाऱ्याला भरदिवसा लुटल्याची घटना घडली आहे. आता शेतकऱ्यांच्या खिशातून रक्कम लंपास केल्याची घटना घडली. त्यामुळे कुरुंदा ठाण्यांतर्गत चोरीच्या घटना वाढल्याचे दिसून येत आहे. या घटनांचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. विठ्ठल बोखारे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींविरोधात कुरूंदा पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास कुरुंदा पोलीस करत आहेत.