तक्रार नंतर, आधी हद्द कोणती ती सांगा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:36 IST2021-09-09T04:36:32+5:302021-09-09T04:36:32+5:30
हिंगोली : सर्वसामान्यांच्या सोयीसाठी जिल्ह्यात १३ पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यात आली आहे. परंतु, बहुतांश वेळा हद्दीचा मुद्दा उपस्थित करून ...

तक्रार नंतर, आधी हद्द कोणती ती सांगा?
हिंगोली : सर्वसामान्यांच्या सोयीसाठी जिल्ह्यात १३ पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यात आली आहे. परंतु, बहुतांश वेळा हद्दीचा मुद्दा उपस्थित करून तक्रार घेण्यास नकार दिला जातो. दोन महिन्यांपूर्वी औंढा व बासंबा भागात पोलीस ठाणे हद्दीवरून तक्रारदारास
परत जावे लागले होते. जिल्ह्यात सद्य:स्थितीत १३ पोलीस ठाणे कार्यरत आहेत. या पोलीस ठाण्यात जवळपास ७५ पोलीस अधिकारी कार्यरत असून १ हजार ८४ पोलीस कर्मचाऱ्यांचा त्यात समावेश आहे. बहुतांश वेळा तक्रार नोंदवून घेण्याआधी गुन्हा कोणत्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला याची विचारणा केली जाते. तो जर दुसऱ्या पोलीस ठाण्यात असेल तर तक्रारदाराला तिकडे जा असे सांगितले जाते. वास्तविक पाहता ‘सीआरपीसी’ १५४ प्रमाणे तक्रारदार ज्या पोलीस ठाण्यात गेला आहे तिथेच गुन्हा दाखल करणे बंधनकारक आहे. हद्द दुसऱ्या ठाण्याची असल्यास नंतर तो त्या ठाण्याकडे वर्ग करणे अपेक्षित आहे.
जिल्ह्यातील एकूण पोलीस ठाणे १३
पोलीस अधिकारी ७५
पोलीस कर्मचारी १०८४
वेळ व पैसा वाया जातो...
दोन महिन्यांपूर्वी जिल्ह्यातील औंढा व बासंबा भागात तक्रार देण्यास काही तक्रारदार गेले होते. त्या वेळी हद्द ही दुसऱ्या पोलीस ठाण्याची आहे. तिथेच जाऊन तक्रार द्या, असे संबंधित पोलीस ठाण्यांनी सांगितले होते. तक्रार न घेतल्यास त्या तक्राराचा वेळ वाया जातो. तसेच नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.
तक्रार घेणे हे गरजेचेच...
पोलीस ठाण्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीची सहानुभतीपूर्वक विचारपूस केली जाते. तक्रारदारांचा अर्जही स्वीकारला जातो. प्रत्येकाची तक्रार घेणे हे त्या-त्या पोलीस ठाण्याचे कर्तव्य आहे. तक्रारदारांची तक्रार घेतली नाही तर संबंधित कर्मचाऱ्यास सूचना दिली जाते.
प्रतिक्रिया...
कोणतीच तक्रार हद्दीवरून थांबविली जात नाही. हिंगोली शहर व हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यासारखे जवळ-जवळ ठाणे असतील तर तक्रारदारांनी तक्रार घेण्यासाठी हट्ट करणे चुकीचेच आहे. तक्रारदारांनी शक्यतोवर संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यास योग्य राहील. तसे पाहिले तर तक्रार कोणत्याही पोलीस ठाण्यात घेतली जाते.
- राकेश कलासागर, पोलीस अधीक्षक