नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:55 IST2021-02-21T04:55:43+5:302021-02-21T04:55:43+5:30
हिंगोली: जिल्ह्यात फेब्रुवारी, मार्च, एप्रिल २०२० मध्ये गारपीट व अवकाळी पावसाने तब्बल ९२९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. ...

नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार मदत
हिंगोली: जिल्ह्यात फेब्रुवारी, मार्च, एप्रिल २०२० मध्ये गारपीट व अवकाळी पावसाने तब्बल ९२९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. यामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने मदत देण्याचा निर्णय घेतला असून यासाठी जिल्ह्याला १३०.१८ लक्ष रूपयांचा निधी वितरीत केला आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हा निधी जमा केला जणार आहे.
राज्यभरात डिसेंबर २०१९ ते जानेवारी २०२० या कालावधीत गारपीट व अवेळी पावसाने शेतीपिकाचे मोठे नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याच्या सूचना शासनाने कृषी आयुक्तालयाला केल्या होत्या. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाने नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून ९२९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल कृषी आयुक्तालयाकडे सादर केला होता. त्यानुसार जिल्ह्याला १३०.१८ लक्ष रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. हा निधी नुकताच शासनाने वितरीत केला असून लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे. नियमानुसार शेती, बहुवार्षिक फळपिकांच्या नुकसानीकरीता मदत ३३ टक्क्े अथवा त्याहून अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे. यासंदर्भात शासनाने शासन निर्णय जारी केला असून ही मदत कृषी सहाय्यक, तलाठी व ग्रामसेवक यांच्या संयुक्त स्वाक्षरीने पूर्ण करण्यात आलेल्या पंचनाम्यानुसार बाधित शेतकऱ्यांना वाटप करावी, मदतीची रक्कम खातेदारांच्या बँक खात्यावर थेट जमा करताना मदतीच्या रक्कमेतून कोणत्याही बँकेने कोणत्याही प्रकारची वसुली करू नये, अशा सूचना शासनाने दिल्या आहेत.