छेडछाडप्रकरणी आरोपीस एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व १५ हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:27 IST2021-02-07T04:27:57+5:302021-02-07T04:27:57+5:30

हिंगोली : एका १८ वर्षीय पीडितेच्या खोलीवर जाऊन तिची छेडछाड केल्याप्रकरणी दोषी आरोपीस एक वर्ष सक्तमजुरी व १५ हजारांच्या ...

Accused in molestation case sentenced to one year hard labor and fined Rs 15,000 | छेडछाडप्रकरणी आरोपीस एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व १५ हजारांचा दंड

छेडछाडप्रकरणी आरोपीस एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व १५ हजारांचा दंड

हिंगोली : एका १८ वर्षीय पीडितेच्या खोलीवर जाऊन तिची छेडछाड केल्याप्रकरणी दोषी आरोपीस एक वर्ष सक्तमजुरी व १५ हजारांच्या दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एन.बी. शिंदे यांनी ५ फेब्रुवारी रोजी सुनावली आहे. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात पीडितेने ९ ऑक्टोबर, २०१२ रोजी फिर्याद दिली होती. फिर्यादी पीडितेची तब्येत ठीक नसल्याने ती खोलीवर होती, तर तिचा भाऊ सकाळी ११ वाजता कॉलेजला गेला होता. दुपारी एक वाजेच्या सुमारास आरोपी श्यामराव किशन सोळंके (वय ३२ रा. पातोंडा ता.जि. हिंगोली) हा खोलीवर आला. त्याने वाईट हेतूने छेडछाड केली, तसेच भावाचे शिक्षण होऊ देणार नाही, असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. यावरून हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद होऊन जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले होते. जिल्हा व सत्र न्यायालयात हे प्रकरण विशेष खटला म्हणून चालले. या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एन.बी. शिंदे यांनी दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून आरोपी श्यामराव किशन सोळंके यास कलम ४५१ भादंविनुसार दोषी ठरवून १ वर्ष सक्तमजुरी व ५ हजारांचा दंड, दंड न भरल्यास २ महिने सक्तमजुरी, कलम ३५४ भादंविनुसार दोषी ठरवून १ वर्ष सक्तमजुरी व ५ हजारांचा दंड, दंड न भरल्यास २ महिने सक्तमजुरी, कलम ५०६ भादंविनुसार दोषी ठरवत १ वर्ष सक्तमजुरी व ५ हजारांचा दंड, दंड न भरल्यास २ महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता एन.एस. मुटकुळे यांनी बाजू मांडली. अंतिम युक्तिवाद सहायक सरकारी अभियोक्ता एस.डी. कुटे यांनी केला.

Web Title: Accused in molestation case sentenced to one year hard labor and fined Rs 15,000