आखाडा बाळापूर ( हिंगोली) : बोथी तळ्यातली माती वाहून नेणाऱ्या भरधाव हायवा ट्रकने कोपरवाडी शिवारात रस्त्याच्या कडेला उभ्या सहा जणांना जोरदार धडक दिल्याची घटना रविवारी ( दि. १८) रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली. यात दोन सख्खे भाऊ जागीच ठार झाले आहेत. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
आखाडा बाळापूर पोलीस ठाणे हद्दीतील बोथी तळ्यातील माती दांडेगाव शिवारात वाहून नेण्याचे काम सुरू आहे. रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास एका भरधाव हायवाने कोपरवाडी शिवारातील रस्त्याच्या कडेला उभ्या 6 जणांना उडवले. या भीषण अपघातात अनिकेत संतोष माहुरे (18) आणि अरविंद संतोष माहुरे (16 रा. कुपटी ) या दोन भावांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अनिकेत बालाजी मुळे (राहणार आसेगाव ), संतोष भालेराव मारकडे (21), गजानन बालाजी मुकाडे, वैभव अंकुश डुकरे (सर्व राहणार कोपरवाडी ) हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर नांदेड येथे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच ठाणेदार विष्णुकांत गुट्टे, पोलीस उपनिरीक्षक गणेश गोटके, जमादार शेख अन्सार, जमादार राजीव जाधव घटनास्थळी जाऊन पाहणी केली. दरम्यान, पोलिसांनी संशयित हायवा वाहन आणि काही लोक चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नसून पोलिस पुढील तपास करत आहेत.