अ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:27 IST2021-04-14T04:27:03+5:302021-04-14T04:27:03+5:30
हिंगोली : ब्रेक दि चेनच्या निर्बंधांना झुगारून मंगळवारी पुन्हा काही व्यापाऱ्यांनी काही काळ दुकाने उघडली; तर काही वेळानंतर अर्ध्यावर ...

अ
हिंगोली : ब्रेक दि चेनच्या निर्बंधांना झुगारून मंगळवारी पुन्हा काही व्यापाऱ्यांनी काही काळ दुकाने उघडली; तर काही वेळानंतर अर्ध्यावर दुकाने उघडी ठेवून व्यवसाय सुरू ठेवला. आज कोणतेही पथक न फिरकल्याने हा धंदा चांगलाच तेजीत होता. सोमवारी (दि. १२) दुकाने उघडी ठेवण्यासाठी व्यापारी महासंघाच्याच एका गटाने प्राेत्साहन दिल्याने व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली होती. मात्र सोमवारी एका व्यापाऱ्यास पोलिसांनी ठाण्यात नेण्याचा प्रकार घडल्यानंतर दुकाने बंद झाली होती. अधिकाऱ्यांचे पथकही बाजारपेठेत फिरले होते. आज मात्र ठिकठिकाणी पोलीस बसलेले दिसून आले. इतर कोणतेही पथक नव्हते. बाजारपेठेत आज सुरुवातीचा काही काळ निर्बंध असलेली दुकानेही सुरू होती. त्यांनी काही ग्राहकांना आधीच सांगून ठेवल्याप्रमाणे बोलावून मालही दिला. नंतर दुकाने बंद केली. तसेच नंतर अशी दुकाने अर्ध्यावर शटर ओढून चालू ठेवली.
काही दुकानदारांनी तर सुरुवातीपासूनच शटरबाहेर माणसे उभी करून ग्राहकाला अपेक्षित असलेला माल आतून बोलावत तो उपलब्ध करून दिला. काहीच काम नसताना भर उन्हात दुचाकी लावून ही मंडळी व्यवसाय करण्यासाठी बसत असल्याचे दिसून आले. या उन्हामुळेच त्रास होऊन आजारी पडण्याची भीती असली तरीही ही मंडळी व्यापार करणे मात्र सोडत नसल्याचे दिसत होते. इतर अनेकांनी मात्र आपली दुकाने बंद ठेवून प्रशासनाला सहकार्य करणेच पसंत केले. कापड, मोबाईल, इलेक्ट्रिकल्स अशा अनेक दुकानदारांनी मंगळवारी अर्ध्या शटरआडूनच व्यवसाय केला.