जिल्ह्यात ९६ टक्के बरसला पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:34 IST2021-09-06T04:34:04+5:302021-09-06T04:34:04+5:30
हिंगोली : जिल्ह्यात दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर शनिवारी व रविवारी पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे नदी, ओढ्यांना पूर आला. या ...

जिल्ह्यात ९६ टक्के बरसला पाऊस
हिंगोली : जिल्ह्यात दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर शनिवारी व रविवारी पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे नदी, ओढ्यांना पूर आला. या पावसाने पिकांना दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत जून ते सप्टेंबर या मान्सून कालावधीतील होणाऱ्या एकूण पावसाच्या सरासरीत ९६.३२ टक्के पाऊस झाला. गतवर्षी याच कालावधीत १२०.४८ टक्के पाऊस झाला होता. या पावसाने रब्बी हंगामाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
जिल्ह्यात मागील दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर शनिवारी पावसाने सर्वदूर हजेरी लावली. काही ठिकाणी जोराचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. रविवारीही काही भागात पाऊस झाला. पावसाने ओढ्यांना आलेल्या पुराच्या पाण्यात तीन जण वाहून गेल्याची घटनाही घडली. तसेच ओढा, नदीकाठच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या मान्सून कालावधीत वार्षिक सरासरीच्या ९६.३२ टक्के पाऊस झाला. यात सर्वाधिक पाऊस औंढा तालुक्यात झाला असून त्याची टक्केवारी ११८.४५ टक्के आहे. त्यानंतर कळमनुरी १०३.९२, सेनगाव ९४.९३, हिंगोली ८८.४० तर वसमत ८६.९८ टक्के पाऊस झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत सध्यापर्यंत २४.१६ टक्के पाऊस कमी झाला आहे. गतवर्षी याच कालावधीत १२०.४८ टक्के पाऊस झाला होता.