कळमनुरी : तालुक्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. तालुक्यात १५५ गावे असून, त्यापैकी ७९ गावांत
कोरोना पोहोचला असून, अद्यापही ७६ गावांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही, हे विशेष. सध्या तालुक्यात ५१ कोरोनाचे क्रियाशील रुग्ण आहेत. या रुग्णांवर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ८६३ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्यापैकी ८१३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. हिंगोली जिल्हा व परजिल्ह्यात १५५ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. जिल्हास्तरावर २७ रुग्णांना, तर जिल्हा बाहेर ५४ रुग्णांना संदर्भित करण्यात आलेले आहे.
आतापर्यंत १९ हजार ७५१ जणांची कोरोनाबाबत तपासणी करण्यात आली आहे. ४३४ जणांचे प्रलंबित स्वॅब घेण्यात आले आहेत. तालुक्याबाहेर २० जणांचा मृत्यू झाला आहे, तर तालुक्यात एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. तालुक्याचा पॉझिटिव्हिटी रेट ४.४ टक्के आहे. तालुक्याचा डबलिंगन दर १९० दिवसांचा असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.२१ टक्के आहे. मृत्यूदर १.९६ टक्के आहे.
२३ गरोदर मातांना कोरोनाची लागण झालेली होती. तालुक्यातील एकूण गावे १५५ असून, त्यापैकी ७९ गावांमध्ये कोरोना पोहोचला असून, ७६ गावांत अजूनही कोरोना पोहोचलेला नाही. सध्या तालुक्यातील आखाडाबाळापूर, वाकोडी, कुपटी, वारंगा, शेवाळा, सांडस, देवजना, माळेगाव, पोतरा, चिखली, येळेगाव गवळी, डोंगरगावनाका, जटाळवाडी या गावांत कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.
शासनाच्या नियमांचे पालन करावे
सध्या कोरोनाने आपले डोके वर काढले असून, रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. तेव्हा नागरिकांनी तोंडाला मास्क लावावा, सामाजिक अंतराचे पालन करावे, हात वारंवार सॅनिटायझरने स्वच्छ करावेत, शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शेख रौफ, वैद्यकीय अधीक्षक डॉ. आनंद मेने यांनी केले आहे.